कोल्हापूर : खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी अवकाशातील अनेक खगोलीय घटना पाहिल्या असतील, परंतु सोमवारी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक या मानवनिर्मित अवकाशीय वस्तूचे तब्बल सात मिनिटे कोल्हापूरच्या अवकाशात दर्शन उघड्या डोळ्यांनी घेण्याची संधी मिळाली.
चंद्राच्या जवळून प्रवास करताना हे अवकाशस्थानक सोमवारी ६ वाजून २६ मिनिटांनी कोल्हापूरच्या अवकाशात दक्षिण-पूर्वे दिशेकडून उत्तरेच्या दिशेला पृथ्वीवरुन सरासरी ६२ अंश डिग्री इतक्या उंचीवर दिसले. या स्थानकाचा वेग प्रचंड असतो, त्यामुळे अल्पकाळ दिसते. शहराभोवतीचा प्रखर प्रकाश, प्रदूषण आणि ढगाळ हवामानामुळे अनेकांना हे स्थानक दिसले नाही.
कोल्हापूरकरांना आज, उद्या पुन्हा पाहता येईल स्थानक
आज दि. १५, आणि १६ नोव्हेंबर रोजी हे अवकाश स्थानक पुन्हा कोल्हापूरच्या अवकाशात पहायला मिळेल. पश्चिमेकडून उत्तरेकडच्या दिशेला. आज, मंगळवारी दि. १५ रोजी पहाटे ४.२४ मिनिटांनी १० अंश डिग्री कोनातून, तर सायंकाळी ७. १६ मिनिटांनी ३ मिनिटांसाठी क्षितिजापासून १२ अंश डिग्री कोनात दिसेल. याशिवाय बुधवार, दि. १६ मे रोजी १५ डिग्री अंशातून सायंकाळी ६ वाजून २६ मिनिटांनी जास्तीत जास्त काळ म्हणजे, सहा मिनिटांसाठी हे स्थानक दिसू शकेल. अर्थात हे स्थानक क्षितिजाच्या अगदी जवळून जाणार असल्यामुळे फारच कमी कालावधीसाठी दिसणार आहे. हे स्थानक दक्षिण-पश्चिम दिशेतून वर येताना दिसेल. सिंह राशीतला मघा तारा आणि कन्या राशीतला चित्रा तारा यांच्या मध्ये हे स्थानक दिसणार आहे आणि ते शोधायलाही सोपे जाणार आहे.
हे स्थानक सूर्य उगवण्याच्या कांही क्षणातच आढळून येते. सूर्याचा प्रकाश या स्थानकाच्या सोलरपॅनेलवरुन परावर्तित होताच ते चमकते आणि त्याचे दर्शन होते. रविवारी आणि सोमवारीही अनेक खगाेल अभ्यासकांनी हे स्थानक सात मिनिटांच्या आसपास प्रत्यक्षात पाहिले. कळंबा, पुईखडी भागातील उंच टेकडीवरुन त्याचे चांगले दर्शन होईल. -प्रा. डॉ. राजीव व्हटकर,समन्वयक, अवकाश संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ