निपाणी : बंदघराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ४० तोळे सोने व ७० हजार रोख रक्कम लांबविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. येथील निराळे गल्लीत राहणारे प्रा. कोळकी यांच्या घरी ही चोरी झाली आहे. वर्दळीच्या ठिकाणी एवढी मोठी धाडसी चोरी झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, व्ही. एस. एम. संस्थेत प्राध्यापक असलेले संतोष ईश्वर कोळकी हे निराळे गल्लीत राहतात. गुरुवारी सायंकाळी घराला कुलूप लावून ते कुटुंबासह कार्यक्रमानिमित्त संकेश्वरला गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद दरवाजा तोडून चोरी केली.
वरच्या मजल्यावरील दोन तिजोऱ्या कटावणीच्या साहाय्याने फोडून त्यामधील ४० तोळे सोने व ७० हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर कोळकी यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याठिकाणी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वान घरापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत घुटमळले. तसेच शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुमार, कुंभार गजानन भोई, राजू कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली.
११ निपाणी चोरी
फोटो
निपाणी : चोरट्यांनी घरातील साहित्य विस्कटून टाकले होते.