कोल्हापूर : जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे ७० हजार डोस रविवारी सकाळी उपलब्ध होणार आहेत. त्याचे दुपारपर्यंत वितरण करण्यात येणार असून, त्यानंतर जिल्ह्यात लसीकरण सुरू होईल. लसीकरण मोहिमेचे समन्वय अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरामध्ये लस नसल्याने केवळ ४ हजार ६४६ इतकेच लसीकरण झाले आहे. यामध्ये १७३९ नागरिकांनी पहिला तर २९०७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. २३८ पैकी केवळ १०६ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.
गेले दोन दिवस मागणी केल्यानंतर रविवारी सकाळी १० च्या सुमारास ७० हजार डोस जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. तेथून ते महापालिकेला आणि जिल्ह्यातील केंद्रांवर पुरवठा करण्यात येईल. जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचे ५ हजार डोस शिल्लक आहेत. दुपारनंतर कोविशिल्डचे लसीकरण जिल्ह्यात सुरू होईल. त्यामुळे सकाळी लवकर केंद्रावर न जाता नागरिकांनी दुपारी १२ नंतर जाणे सोयीचे ठरणार आहे.
चौकट
एक हजार रेमडेसिविर खरेदी करा
जिल्ह्यासाठी एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांना त्यांनी या सूचना दिल्या असून, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले. शनिवारी सकाळी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना केली.