कोल्हापूर, दि. ५ : कोल्हापूरात रात्री ९ वाजेपर्यंत एकूण ७0२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोल्हापूरातील रंकाळा इराणी खण, राजाराम बंधारा, बापट कॅम्प, कोटीतीर्थ आणि पंचगंगा नदीवर घरगुती गणेश मूर्तींसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात २१ फूटी ३ गणेशमूर्तींचा समावेश आहे.
रात्री ९ वाजेपर्यंत पंचगंगा नदीवर सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुधाकर जोशी नगरातील एकी तरुण मंडळाच्या पहिल्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. त्यानंतर लेझिम, ढोल, ताशाच्या कडकडाटात विसर्जन मिरवणुक सुरु होती.
कसबा बावडा येथील राजाराम बंधारा आणि कोटीतीर्थ येथे रात्री आठ वाजेपर्र्यत १0४ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले तर ११0 गणेश मूर्तीं दान देण्यात आल्या. कोल्हापुरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी राजाराम बंधारा येथे आपल्या गणेशमूर्तीचे दान केले.
इराणी खणीत १७१ गणेश मूर्तींचे विसर्जन
येथील क्रशर चौकातील इराणी खणीत मंगळवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १७१ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. येथे २१ फुटी असलेल्या तीन गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यासाठी खास क्रेन मागविण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी चौक, बजापराव माजगांवकर तालीम मंडळ आणि राजारामपुरीतील भगतसिंग तरुण मंडळाच्या तीन २१ फुटी गणेशमूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करण्यात आले.पंचगंगा नदीवर रात्री आठपर्यंंत ३९१ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ७४ गणेश मूर्त्यां दान करण्यात आल्या.
अनावश्यक, व्यावसायिक कक्ष पोलिसांनी हटविलेदरम्यान, महाद्वार रोड ते गंगावेश या मिरवणुक मार्गावर असलेले गणेश मंडळांचे स्वागत करणारे अनावश्यक आणि व्यावसायिक कक्ष पोलिसांनी हटविले. पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर तब्बल ११ मंडप आहेत.लेझीम पथकांसोबत ताल धरला खासदारांनी
कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्दानी खेळ आणि झांज पथकांसोबत लेझिमच्या तालावर नृत्य केले. त्यांच्यासोबत तरुणाईनेही बेधुंद नाच केला. त्यांनी बाप्पा मोरयाच्या गजरात या गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाला निरोप दिला.