कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सर्वत्रच अत्यंत ईर्ष्येने व ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे रांगा लावून मतदान झाले; त्यामुळे कोल्हापूरमध्ये सरासरी ७१, तर हातकणंगले मतदारसंघात सुमारे ७० टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये ७४, तर हातकणंगलेत ७२ टक्के मतदान झाले होते. या दोन मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी या निवडणुकीतही राज्यातच काय देशात सर्वाधिक आहे. मतदान झाल्यानंतर आता लोकांच्या नजरा २३ मे रोजी होणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. ऊस्फूर्तपणे झालेले मतदान कुणाला तारक व कुणाला मारक ठरते याचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत.केंद्रनिहाय मतदान एकत्रित करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री नऊ वाजता मतदानाची सरासरी आकडेवारी जाहीर केली. ती गेल्या निवडणुकीपेक्षा एक ते तीन टक्क्यांनी कमी असली तरी ती वाढण्याची शक्यता आहे. २२२ मतदानयंत्रांत, २२७ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना त्रास सोसावा लागला. १४५ मतदान केंद्रावर रात्री ८ पर्यंत मतदान सुरू होते.२९ गावांत बहिष्कारकोल्हापूर मतदारसंघात धामणी मध्यम प्रकल्पाचे काम अर्धवट ठेवल्याच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील १६ आणि पन्हाळा तालुक्यातील ११ गावांनी मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकला. या गावांत सुमारे ११ हजार मतदान आहे. पाचकटेवाडी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदान केले नाही. तिथे ४०० मतदान आहे. हातकणंगले मतदारसंघांतील वाघोशी (ता. शाहूवाडी) धनगरवाड्यावरील ३० मतदारांनी विकासकामे झाली नाहीत म्हणून बहिष्कार टाकला.बोगस मतदानाची तक्रारकोल्हापूर दक्षिण मतदार संघातील मोरेवाडी केंद्र क्रमांक २७४/१९१ या केंद्रावर आपल्या नावे अगोदरच कुणीतरी बोगस मतदान केल्याची तक्रार पूजा सुधाकर लोहार (रा. आर. के. नगर सोसायटी क्रमांक ४) यांनी केली. त्या सायंकाळी साडेपाच वाजता मतदानासाठी गेल्या होत्या;परंतु तत्पूर्वीच त्यांच्या नावावर मतदान झाले होते; त्यासाठी मतदान ओळखपत्राचा पुरावा दिला होता; परंतु त्या क्रमांकाचे त्यांचे ओळखपत्र नाही. सहीही बनावट होती. त्याबद्दल त्यांनी केंद्राध्यक्षांकडे तक्रार केली; परंतु कुणी त्यांना दाद दिली नाही.
कोल्हापुरात ७१, हातकणंगलेत ७०% मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:01 AM