कोल्हापूर : करवीरनिवासीनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासांतर्गत पहिल्या टप्प्यात ७२ कोटींचा आराखडा सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील हा आराखडा फक्त अंबाबाई मंदिर व परिसराच्या विकासासाठी राहणार आहे. त्याच्या आर्थिक तरतुदीसाठी हा आराखडा लवकरात लवकर शासनाला पाठविण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना केल्या.करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचा सुधारित २५५ कोटी रुपयांचा आराखडा पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नगरविकास खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या आराखड्यातील पहिल्या टप्प्यात ७२ कोटी रुपयांची कामे आहेत. पहिल्या टप्प्यातील निधी हा फक्त अंबाबाई मंदिर व परिसरातील विकासासाठीच राहावा, अशा सूचना मुंबई येथे झालेल्या गत आढावा बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी सैनी यांना केल्या होत्या.त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होेते.याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर या आराखड्याला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली व पुढील आर्थिक तरतुदीसाठी लवकरात लवकर हा आराखडा शासनाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. (प्रतिनिधी) असा असणार आराखडाअर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ७२ कोटींचा अंबाबाई परिसराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये शिल्पवैभवांनी नटलेल्या मूळ मंदिराच्या मूळ वास्तूचे संवर्धन, दीपमाळ, गरुड मंडप, नगारखाना, मंदिर दरवाजे, दरवाजांशी संलग्न भिंती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कार्यालय, महालक्ष्मी बगीच्याचे सुशोभीकरण, कारंजा आणि स्वच्छतागृहे, आदींचा या आराखड्यात समावेश आहे. त्याचे विस्तृत सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर केले. हा आराखडा अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार केल्याने पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
७२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी
By admin | Published: February 16, 2016 1:03 AM