कोल्हापूर : महापालिकेचा सन २००४ ते २०११ या कार्यकालामध्ये घरफाळ्याचे ७३ कोटी ३३ लाख रुपये कमी जमा झाली आहे. तत्कालिन मुख्य लेखापरीक्षक प्रकाश कोळेकर यांचे घरफाळा लेखापरीक्षण अहवालात ही माहिती उघड झाली आहे. अहवालाप्रमाणे तत्कालिन प्रभारी करनिर्धारक संजय भोसले यांना त्वरित निलंबन व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.यामध्ये म्हटले आहे की, लेखापरीक्षक कोळेकर यांनी सन २००४ ते २०११ चे संपूर्ण घरफाळ्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी भाडे करार, करआकारणी तक्ता, रिव्हिजनचे असेसमेंट फॉर्म, घरफाळा जमा रकमेची बिले, पावत्या, चालू मागणी डिमांड, थकबाकीची नोटीस, मागील थकबाकी आदी माहिती त्वरित पुरवावी यासाठी एकूण ४ पत्रे करनिर्धारक संजय भोसले यांना दिली. परंतु त्यांनी लेखापरीक्षण पथकास माहिती उपलब्ध करून दिली नाही.
कोळेकर व लेखापरीक्षण पथक १ जून २०११ रोजी घरफाळा विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची माहिती घेऊन त्यांनी या संपूर्ण घरफाळ्याचा अहवाल तयार केला. तत्कालिन आयुक्त व स्थायी समिती यांना अहवाल दिला. त्यामध्ये त्यांनी त्रुटी दाखविल्या आहेत. असे असतानाही प्रशासनाने सन २०१२ ते २०२० या कालावधीचे लेखापरीक्षण केलेले नाही.कोळेकर अहवालसंजय भोसले यांनी घरफाळ्याचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. घरफाळ्याची जमा रक्कम किती, थकबाकी किती याची माहिती मिळत नाही. कित्येक थकबाकीच्या रक्कमा या रजिस्टरमधून फाडून टाकलेल्या आहेत. पुढील बिलात कोणतीही थकबाकी दिसत नाही. बांधकाम परवानगीनुसार घरफाळा आकारणी केलेली नाही, दैनंदिन जमा कीर्दवर अधिकाऱ्यांची तपासणी जमा रकमेसोबत सही नाही.