कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जेम्स स्टोन विचारे मार्केट या व्यापारी संकुलावर ठेकेदाराने ६५ कोटी व बेसमेंट पार्किंगवर आठ कोटी बँकेचे परस्पर कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उपमहापौर भूपाल शेटे यांनी उघडकीस आणला. हा घोटाळा महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमताने केल्याची माहिती शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
व्यापारी संकुलाचे बांधकाम ठेकेदार जयहिंद कॉँट्रॅक्टर्स लिमिटेड, डिव्हिजन आॅफ भारत उद्योग लिमिटेडचे चेअरमन श्रीचंद राजाराम कुकरेजा व त्यांचा मुलगा संचालक सूर्यकांत कुकरेजा (दोघेही रा. नेरूळ, नवी मुंबई) यांचा या इमारतीवरील अधिकार संपून तब्बल चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हे कर्ज उचलल्याचे निदर्शनास आले.
बँकेचे कर्जप्रकरण करताना त्यावेळचे महापालिकेचे सहायक आयुक्त संतोष जिरगे व इस्टेट आॅफिसर राम काटकर यांनी बँकेच्या कर्जास देण्यासाठी निवृत्त ठेकेदार कुकरेजा याला बेकायदेशीरपणे महापालिकेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’(संमतीपत्र) दिल्याचाही आरोप शेटे यांनी केला. कुकरेजा पिता-पुत्रासह महापालिकेचे अधिकारी जिरगे व काटकर, कर्जाचा दस्त मंजूर करणारे सहनिबंधक (वर्ग २) एस. के. कलाल, दस्तातील साक्षीदार मॅनेजर अक्षय सुरेश नलवडे व कर्ज मंजूर केलेली करूर वैश्य बँक, वाशी, नवी मुंबई, शाखा राजारामपुरीचे अधिकारी यांच्यावर आयुक्तांनी फौजदारी दाखल करावी, अन्यथा शासनाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा उपमहापौर शेटे यांनी दिला.
शेटे म्हणाले, महानगरपालिकेच्या नावे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रि. स. न. ५१७/२, ई वॉर्ड येथे ८९०३.१ चौरस मीटर जागा असून, त्यावर ‘एफबीटी’ (फायनान्स, बिल्ड अँड ट्रान्स्फर) तत्त्वावर २००१ साली प्रकल्प राबविला. कन्स्ट्रक्शनचे काम जयहिंद कन्स्ट्रक्शन लिमिटेड, डिव्हिजन आॅफ भारत उद्योग लिमिटेडला दिले. प्रकल्प २००६ मध्ये पूर्ण करून महापालिकेकडे हस्तांतरित केला; त्यामुळे कॉँट्रॅक्टरचे हक्क संपले. विचारे विद्यालयाच्या इमारतीचीही जागा महापालिकेच्या नावे हस्तांतरित झाली; पण त्यानंतरच कॉँट्रॅक्टर श्रीचंद कुकरेजा व त्यांचे पुत्र सूर्यकांत कुकरेजा यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून २०१० ते २०१४ दरम्यानच्या कालावधीत व्यापार संकुलावर ६५ कोटी रुपये, तर बेसमेंटच्या पार्किंगवर आठ कोटी रुपये करूर वैश्य बँक, वाशी, नवी मुंबई, शाखा राजारामपुरी येथून कर्ज काढून महापालिकेला फसविले.
गेल्या पाच-सहा वर्षांत कुकरेजा याने एकही रुपया बँकेत भरला नसल्याचे शेटे यांनी सांगितले. व्यापारी संकुलाची इमारत व भाजी मार्केटचे २०० गाळे, तसेच पार्किंगचे २०६९६ स्क्वे. फू. क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरित झाले. इतर १०२ गाळेधारकांकडून मोबदला स्वीकारून ९९ वर्षे भाडेपट्टीने गाळे दिले. असे असताना कुकरेजा यांनी संपूर्ण संकुलावर कर्जे काढल्याने गाळेधारक अडचणीत आले.अधिकार नसताना दिली ‘एनओसी’या व्यापारी संकुलावरील कॉँट्रॅक्टर कुकरेजा यांचा अधिकार २००६ मध्येच संपला होता. त्यानंतरही महापालिकेचे सहायक आयुक्त संतोष जिरगे व इस्टेट अधिकारी राम काटकर यांनी कुकरेजा यांना व्यापार संकुलावर कर्जे काढण्यासाठी महापालिकेची ‘एनओसी’ दिली. ‘एनओसी’मध्ये बेसमेंट पार्किंगचे २०६९६ स्क्वे. फू. हे महापालिकेच्या मालकीचे असे नमूद केलेले नाही. अधिकाºयांनी महापालिकेच्या वकिलांकडून अभिप्रायही घेतला नाही अगर प्रकरण त्रिसदस्यीय समितीसमोर ठेवले नाही. कॉँटॅÑक्टरकडून पैसे घेऊन ही ‘एनओसी’ दिल्याचा आरोप शेटे यांनी केला.८९०३.१ चौरस मीटर जागाजेम्स स्टोन व्यापारी संकुल उभारणी २००१ ला प्रारंभ, २००६ ला पूर्ण व मनपाकडे हस्तांतरव्यापारी संकुलातील एकूण ३०२ गाळ्यांपैकी २०० गाळे महापालिकेच्या मालकीचे२००६ ला महापालिकेकडे हस्तांतरानंतर व्यापारी संकुलावरील कॉँट्रॅक्टरचा अधिकार संपला.२०६९६ स्क्वेअर फूट बेसमेंट पार्किंग जागा२०१० ते ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत सहनिबंधक वर्ग-२ नोंदणी कार्यालय नं. ४ मध्ये कर्जाचे दस्त नोंदणी केले. यादरम्यानच हे सर्व कर्ज उचलले.
महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलावर (जेम्स स्टोन) मोठे कर्ज काढल्याचे समजते. तसे असेल तर ही बाब गंभीर आहे. त्याबाबत चौकशी करू. तसेच महानगरपालिकेचे अधिकारीही या प्रकरणात गुंतले असतील तर दोषींवर निश्चितपणे कारवाई करू.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महापालिका