लोकमत न्यूज नेटवर्क
कराड (जि. सातारा) : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २९) अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. या निवडणुकीसाठी सरासरी ७३ टक्के मतदान झाले. गुरुवारी (दि. १) कराड येथे मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजीत मोहिते, अविनाश मोहिते यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र असल्याने दोन्ही जिल्ह्यातील वातावरण गत महिनाभरापासून ढवळून निघाले होते. या निवडणुकीत सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल विरोधात डॉ. इंद्रजीत मोहिते यांचे रयत पॅनेल व अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल असा हा सामना रंगला होता. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
गुरुवारी कार्यक्षेत्रातील गावात १४८ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान शांततेत झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची संख्या वाढल्याने कोणत्याही मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसली नाही. गुरुवारी (दि. १) कराड येथील शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे. मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.