कोल्हापूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांची नोंदणी झाली आहे. यातील सात हजार ४०० शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत ३१ हजार शेतकºयांच्या खात्यांवर पैसे जमा केले जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी येथे सांगितले.केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात झाला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी देसाई व आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते या योजनेंतर्गत दहा शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, यावेळी गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने’च्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पहिला हप्ता येत्या गुरुवार (दि. २८) पर्यंत जमा करण्याचा निर्धार आहे. यातील ३१ हजार जणांच्या खात्यावर दोन दिवसांत पैसे जमा केले जातील. या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजारांचे आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे.आमदार महाडिक म्हणाले, या योजनेत जिल्ह्यातील सर्वच पात्र शेतकरी कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे शेतकºयांच्या जीवनात निश्चितपणे स्थिरता येईल. तसेच प्रशासनाने ही योजना राबविताना येणाºया अडचणी व त्रुटींची तत्काळ पूर्तता करून ही योजना गतिमान करावी.यावेळी प्रमुख उपस्थिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, राधानगरीचे प्रांताधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ, आदींची होती.ज्ञानदेव वाकुरे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी करवीरचेतहसीलदार सचिन गिरी, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, आदींसह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.योजनेत कोल्हापूरची राज्यात आघाडीया योजनेची जिल्ह्यात गतिमान वाटचाल सुरू असून आतापर्यंत या योजनेस पात्र असणाºया ३ लाख ७६ हजार ४३९ कुटुंबांपैकी तीन लाख एक हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी करून पुणे विभागासह किंबहुना राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सात हजार ४०० शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा केला आहे. उर्वरित सर्व पात्र कुटुंबांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम प्राधान्यक्रमाने जमा केली जाईल. ही रक्कम पात्र शेतकरी कुटुंबांच्याच खात्यावर जमा होण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवला जात आहे, असे देसाई यांनी सांगितले.
७ हजार ४०० शेतकऱ्यांचा ‘सन्मान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 1:09 AM