लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात महापुरामुळे सर्व यंत्रणा कोलमडली असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांत सहा लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचे २१ लाख लिटर दूध घरातच राहिल्याने सात कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. महापुरामुळे शेती व पिकांचे किती नुकसान झाले याची मोजदाद नाही. त्याचे पंचनामे अजून सुरू झालेले नाहीत, पण दुधाचे दहा दिवसांचे बिल म्हणजे शेतकऱ्यांच्या रोजीरोटीशी संबंधित आहे, त्यालाही मोठा फटका बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात रोज गोकुळ, वारणा दूध संघांसह इतर संघांचे २१ लाख लिटर दूध संकलन होते. पुरामुळे गुरुवार (दि. २२) पासून दूध वाहतुकीचे मार्ग विस्कळीत झाले आहेत. गुरुवारी गोकुळचे एक लाख लिटर संकलन कमी झाले. शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांत बारा लाख लिटर संकलन होऊ शकले नाही. वारणा दूध संघाचेही या चार दिवसांत सुमारे पाच लाख लिटर संकलन कमी झाले. इतर संघांचेही दूध संकलनावर परिणाम होऊन एकूण २१ लाख लिटर दूध उत्पादकांच्या घरातच राहिले. त्यामुळे साडेसात कोटींचे नुकसान उत्पादकांचे झाले आहे.
दूध संकलनाबरोबर विक्रीही होऊ शकलेली नाही. मुंबई, पुणेची वाहतूक होऊ न शकल्याने गोकुळलाही कोट्यवधीचा फटका बसला असून, सोमवारपासून राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्याने वितरण हळूहळू सुरळीत होत आहे.
आजपासून काही मार्ग सुरू
दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने पुराचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे काही मार्ग सुरू झाले, तर काही गावातील दूध वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू झाली आहे.
कोटः
पुरामुळे दूध वाहतूक ठप्प असून, पाणी ओसरेल तसे संकलन वाढेल. मात्र, माणसाबरोबरच जनावरेही स्थलांतरित केल्याने पाऊस कमी झाला असला तरी संकलन पूर्व पदावर येण्यास चार दिवस लागतील.
- विश्वास पाटील
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ, कोल्हापूर.