कोल्हापूर : एकीकडे वेळेवर कर भरा म्हणून वस्तू व सेवा कर विभागाला वारंवार जनजागृती करावी लागत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने मात्र सर्वाधिक कर भरून आघाडी घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने एकूण करापैकी १५ टक्के इतका कर भरून सर्वाधिक योगदान दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मशिनरी आणि मेकॅनिकल इंडस्ट्रीही मोठ्या प्रमाणात आहे. या इंडस्ट्रीने १४ टक्के इतका कर भरला आहे. तर लोखंड, पोलाद व वस्तू क्षेत्रातून जवळपास १२ टक्के इतका कर भरण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते जुलै २०२३ या चार महिन्यात तब्बल ७५०.८३ कोटी रुपयांचा भरणा जीएसटीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. गतवर्षी या चार महिन्यात ६९६.६७ कोटी रुपयांचे संकलन झाले होते.
कर भरण्यात जुलैमध्ये ४.९७ टक्के वाढकोल्हापूर जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षाच्या जुलै महिन्यात १५५.४ कोटी इतके जीएसटीचे संकलन झाले आहे. गतवर्षी जुलै २०२२ मध्ये जीएसटीचे संकलन १४७.६९ कोटी इतके होते. यावर्षी मात्र, जुलै महिन्यात जीएसटी संकलनात ४.९७ टक्के वाढ झाली आहे.
दोन व्यावसायिकांवर कारवाईवस्तू व सेवांचा पुरवठा किंवा खरेदी न करता बनावट बीजके देऊन शासनाची कर फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील दोन व्यावसायिकांना २०२२-२३ या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभागाच्या तक्रारीनंतर अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे कोल्हापूर विभागाच्या राज्यकर सहआयुक्त सुनीता थोरात यांनी सांगितले.
खोटी कागदपत्रे सादर करून, किंवा कागदपत्रांचा गैरवापर करुन बनावट नोंदणी दाखल घेणाऱ्या व्यावसायिकांविरोधात नाेंदणी दाखला रद्द करणे, इनपुट टॅक्स क्रेडिट रोखणे, शास्ती लावणे अशा स्वरुपाची कारवाई केली आहे. - सुनीता थोरात, राज्यकर सहआयुक्त, वस्तू व सेवा कर कोल्हापूर विभाग.