कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील तिसऱ्या टप्प्यांतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गडहिंग्लज व राधानगरी तालुक्यातील एकूण चार कामांकरिता ७ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी मंगळवारी दिली. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील तीन व राधानगरी तालुक्यातील एका रस्त्याचा समावेश आहे.
खासदार मंडलिक म्हणाले, पंतप्रधान ग्रामसडक योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून, ही योजना राज्यात सन २००० सालापासून राबविण्यात येत आहे. सध्या या योजनेचा तिसरा टप्पा कार्यान्वित आहे. गडहिंग्लज व राधानगरी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील रस्ते करण्यासाठी लोकांकडून वारंवार मागणी होत होती. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन हे रस्ते प्राधान्याने मंजूर करण्यात आले आहेत. हे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी खासदार म्हणून माझाही प्रयत्न आहेच; परंतु या कामांवर स्थानिक नागरिकांनीही लक्ष ठेवावे.
मंजूर रस्ते असे : गडहिंग्लज तालुका : मुगळी - तनवडी - हणमंतवाडी - चिंचेवाडी रस्ता - १ कोटी ३५ लाख
प्रजिमा ५६ : जरळी ते शिंदेवाडी - खमलेहट्टी - भडगाव प्रजिमा ५७ रस्ता : १ कोटी ८९ लाख
राज्य मार्ग २०१ - नरेवाडी ते माणवाड - तेरणी रस्त्याकरिता २ कोटी ५२ लाख
गडहिंग्लज तालुक्याकरिता तीन कामांकरिता एकूण ५ कोटी ७६ लाख रुपये
राधानगरी तालुका : घोटवडे - राशिवडे (करवीर तालुका हद्द) या एका रस्त्याकरिता १ कोटी ७६ लाख.