शिरोळ : संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या एकूण १४६४ अर्जांपैकी ७६४ अर्ज पात्र करण्यात आले. ५७२ अर्ज अपूर्ण तर १२८ अर्ज अपात्र ठरविण्यात आले.
शिरोळ येथे संजय गांधी योजना समितीची मंगळवारी बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर होते. कोरोनामुळे माहे मार्च २०२१ पासून समितीची बैठक झाली नव्हती. त्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत विविध योजनेतील एकूण १४६४ अर्ज आले होते. यावेळी ७६४ अर्ज पात्र तर १२८ अर्ज अपात्र ठरविण्यात आले, तर ५७२ अर्जांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या. त्रुटी काढण्यात आलेले अर्ज तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवून पंधरा दिवसात त्रुटींची पूर्तता करून घेऊन पुढील बैठकीत अर्ज ठेवण्यात येतील, असे सचिव तथा तहसीलदार डॉ. मोरे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी रमेश शिंदे, महादेव कोळी, धन्यकुमार सिदनाळे, केशव राऊत, आण्णासो बिलोरे, भालचंद्र लंगरे, अफसर पटेल, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्यासह संजय गांधी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.