राजू पाटील
प्रयाग चिखली : महापुरामुळे वरणगे, पाडळी, चिखली, आंबेवाडी, निटवडे या गावांमधील उच्च दाब वाहिनीचे २३, तर लघुदाब वाहिनीचे ५६ असे मिळून
७९ विद्युत पोल कोसळल्याने या भागातील शेतीपंपाची वीज गायब झाली आहे. त्यामुळे हे पोल तात्काळ उभे न केल्यास माळरानावरची उरलेली पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. महापुरामध्ये नदीकाठची व सखल भागातील पिके कुजून जात आहेत. त्यामुळे माळरानावरील पिकांचाच काय तो शेतकऱ्याला आधार उरला आहे. मात्र, हे विद्युत पोल कोसळल्याने शेतीपंपाची वीज गायब आहे. काही दिवसांनंतर माळरानावरील पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे काेसळलेले विद्युत पोल उभारून वीज यंत्रणा कार्यान्वित करा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
चौकट : ट्रान्सफाॅर्मर वाकले, तारांमध्ये अडकला पाला,
महापूर आणि अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रस्त्याकडेला
असणारे ट्रान्सफाॅर्मर पूर्णपणे वाकले आहेत, तर काही पोल मोडून कधीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. त्यातून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर विद्युत वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात महापुरामुळे उसाचा पाला येऊन अडकला आहे. पाडळी बुद्रुक ते शिंदेवाडी या रस्त्याच्या कडेला असलेला
ट्रान्सफाॅर्मर पूर्णपणे वाकला आहे व त्याच्या जवळ असणारा पोल मोडून कधीही
पडेल, अशा स्थितीत आहे. त्यामुळे महावितरणने या भागातील कोसळलेले विद्युत पोल तात्काळ उभारण्याची गरज आहे.
कोट : वरणगे, पाडळी, निटवडे, आंबेवाडी, चिखली या गावांमधील कोसळलेल्या पोलचा सर्व्हे केला आहे. याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवला असून या कामांसाठी कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध झाला
आहे. लवकरात लवकर पोल उभे करून शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान
टाळण्याची महावितरणची भूमिका आहे.
मंदार भणगे, कनिष्ठ अभियंता, आंबेवाडी
१० प्रयाय चिखली
पाडळी बु. ते शिंदेवाडी रस्त्यादरम्यान वाकलेला ट्रान्सफॉर्मर तसेच त्याच्या शेजारी असलेला विद्युत पोल कधीही कोसळू शकतो.