कोल्हापूर : शहरात डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची तसेच आठ दिवसांत तापाचे ४७ रुग्ण आढळल्याची बाब समोर येत असल्यामुळे महापालिका आरोग्य विभागातर्फे डेंग्यूला प्रतिबंध करण्याकरिता घराघरांत पाणीसाठ्यात अळीनाशक टेमिफॉस सोडणे, गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाईपला जाळी बांधणे, टायर जप्ती मोहीम घेणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत.शहरात डेंग्यूला प्रतिबंध करण्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिले आहेत. त्यानुसार गेल्या शनिवारपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडील १३ सॅनिटेशन वॉर्ड तसेच नागरी आरोग्यकेंद्र यांची संयुक्तपणे १३ पथके तयार करण्यात आली आहेत.
मोहिमेअंतर्गत शहरातील सर्वच ८१ प्रभागांमध्ये तापाच्या रुग्णांचा सर्व्हे करणे, डास अळी सर्वेक्षण करणे, औषध फवारणी करणे, धूर फवारणी करणे, नागरिकांमध्ये डेंग्यू या आजाराविषयी हस्तपत्रकेद्वारे जनजागृती करणे, आदी कामे केली जात आहेत. गेल्या आठ दिवसांत तापाचे ४७ रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी ९६४ घरांत झालेल्या सर्व्हेक्षणात तापाचे १८ रुग्ण आढळून आले.शुक्रवारअखेर ५९ प्रभागांमध्ये मोहीम पूर्ण करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये ८९६६ इतक्या घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आलेले आहे. डास अळी असलेल्या परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आलेली आहे. सदरची मोहीम साधारणत: २०० कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने राबविण्यात येत आहे. यासाठी ६५ स्प्रे पंप, २३ धूर फवारणी मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात आलेली आहे.