कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील मौजे पणुंद्रेपैकी पाटेवाडी येथे सोमवारी अवैध बॉक्साईट उत्खननप्रकरणी धडक कारवाई करून जिल्हा खनिकर्म विभागाने सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये जवळपास सात लाख किमतीचे सुमारे १२०० टन बॉक्साईट, उत्खननासाठी वापरलेल्या जेसीबीला साडेसात लाख रुपये व डंपरसाठी एक लाख रुपयांचा दंडाचा समावेश आहे.पाटेवाडी येथे रामचंद्र निवृत्ती खोत यांच्या शेतात अवैध बॉक्साईट उत्खनन सुरू असल्याबाबत जिल्हा खनिकर्म विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे उपसंचालक दिग्विजय पाटील यांच्या पथकाने शाहूवाडीचे नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, कोतवाल यांच्या साहाय्याने अवैध उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला.
यावेळी जमीन मालक रामचंद्र खोत यांच्या शेतात अवैध बॉक्साइट उत्खनन चालू असल्याचे दिसून आले. तसेच या ठिकाणी जेसीबी मशीन व डंपर बंद स्थितीत आढळला. तत्काळ या पथकाने बॉक्साईटसह मशीन जप्त करून पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील कार्यवाही शाहूवाडीचे तहसीलदार यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे.