कोल्हापूर : मुद्रांक शुल्कातील सवलत देण्याचा शासनाचा निर्णय मुद्रांक विभागाच्या पथ्यावर पडला असून मार्चपर्यंत असणाऱ्या उद्दिष्टापैकी ८० टक्के उद्दिष्टपूर्ती डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास गेली आहे. १२८ कोटींचा महसूल शासनाच्या तिजाेरीत जमा झाला आहे.
अनलॉकनंतर रिअल इस्टेटची आर्थिक घडी पुन्हा रुळावर येण्यासाठी ऑक्टोबरमध्ये मुद्रांक शुल्कात दोन टक्केची सवलत राज्य सरकारने जाहीर केली. तत्पूर्वी हे शुल्क ५ टक्केप्रमाणे आकारले जात होते. डिसेंबरपर्यंत दोन टक्के आणि मार्चपर्यंत एक टक्का, अशी सवलत लागू केली. सवलत लागू झाल्याच्या तीन महिन्यातच खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चांगलीच वाढ झाली. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय झाल्याचा फायदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर करून घेतला. दिवाळीत जमीन, घर खरेदी- विक्रीचे व्यवहार वाढले. शुल्कातील २ टक्के सवलतीचा लाभ घेण्याची मुदत गुरुवारी संपली आणि आजपासून मार्चपर्यंत एक टक्का दरवाढ लागू झाली असली तरी, ऑनलाईन चलन भरणाऱ्यांना पुढील चार महिन्यापर्यंतची ३ टक्केची सवलत कायम राहणार आहे. या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
चौकट०१
जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान झालेली खरेदी-विक्री : ६८ हजार ६७५ दस्त
चौकट ०२
डिसेंबर महिन्यात झालेली खरेदी-विक्री : ९ हजार ४९१ दस्त
चौकट ०३
१२८ कोटींचा महसूल जमा
गेल्यावर्षी मार्चपर्यंत २९४ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला होता. यावर्षी १६० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ८० टक्के पूर्तता झाली असून १२८ कोटी रुपये शासनाला मिळाले आहेत.
चौकट ०४
कोरोनामुळे दस्त नोंदणीचे व्यवहार ठप्प होते. अनलॉकनंतर हे सुरू झाले. शासनाने सवलत लागू केल्यानंतर मुद्रांक शुल्क नाेंदणी कार्यालयात गर्दी वाढू लागली. यावर ऑनलाईन पोर्टलचा पर्याय दिल्यानंतर ही गर्दी ओसरली.
दस्त नाेंदणी फी व मुद्रांक शुल्क डिसेंबरअखेरपर्यंत भरल्यानंतर प्रत्यक्षात दस्त नाेंदविण्यासाठी पुढील चार महिन्यांची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे उगीच कार्यालयात गर्दी करू नये.
- दिलीप पाटील, मुद्रांक शुल्क अधिकारी