- चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठ्यातील तफावतीमुळे साखर उद्योगात आलेल्या तेजीचा फायदा भारतीय साखर उद्योगाला होत आहे. यामुळे यंदा विक्रमी म्हणजेच ८० लाख टनांहून अधिक साखर निर्यात होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी ७१ लाख टन इतकी उच्चांकी साखर निर्यात झाली होती. तिला निर्यात अनुदानाचे पाठबळ होते. यंदा अनुदानाविनाच निर्यातीचा तो विक्रमही मोडित काढला जाणार आहे. आतापर्यंत ७० लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले आहेत. त्यातील ५५ लाख टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे.
देशात यंदा ३३५ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ते ३१२ लाख टन झाले होते. यामध्ये इथेनॉलकडे वळविल्या जाणाऱ्या साखरेचा समावेश नाही. ती सुमारे ३४ लाख टन असेल. यामुळे एकूण साखर उत्पादन ३६९ लाख टनांवर जाणार आहे. हा नवा उच्चांक असणार आहे.
पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल
देशाला ८० टक्के पेट्रोल-डिझेल आयात करावे लागते. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी २०२२ मध्ये पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. ते जवळजवळ साध्य होत आले आहे. देशात चालू वर्षीच्या पहिल्या तिमाहीत काही ठिकाणी ९.३४ टक्के, तर काही ठिकाणी ११ टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात आहे. २०२५ पर्यंत हे प्रमाण २० टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे.
आकडेवारी पाठवा; केंद्राचे आदेश
साखर कारखान्यांनी चालू हंगामात १५ मार्चपर्यंत किती साखर निर्यातीचे करार केले आहेत. त्यातील किती साखर बाहेर पडली आहे. याची आकडेवारी २४ मार्चपर्यंत द्यावी, असे आदेश केंद्र सरकारने गुरुवारी सर्व साखर कारखान्यांना दिले आहेत.