कोल्हापूर : मुख्यमंत्री गट व भाजपच्या आमदारांना ८० टक्के निधी दिल्यावर आम्ही कशी विकासकामे करायची अशी विचारणा काँग्रेसच्या चार आमदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे मंगळवारी केली. शेजारच्या जिल्ह्यात निधीचे वाटप झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. निधी वाटपाबाबत अद्याप कोणतेही सूत्र ठरलेले नसून, आपली मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन जिल्हाधिकारी रेखावर यांनी शिष्टमंडळाला दिले.या शिष्टमंडळात आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, जयश्री जाधव,राजूबाबा आवळे यांचा समावेश होता. ही बाब पालकमंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून द्यावी व आमदारांना समान पद्धतीने वाटप होण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दरवर्षी निधी देण्यात येतो. हा निधी वाटप करत असताना सर्व लोकप्रतिनिधींना समान पद्धतीने निधी वाटप होणे अपेक्षित असते; पण यावेळी निधी वाटप करत असताना वेगळे सूत्र अवलंबिण्यात येणार असल्याचे आम्हाला समजले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे गट ४० टक्के, भाजप ४० टक्के, पालकमंत्री १० टक्के व उर्वरित १० टक्के निधी विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे सहा, तर राष्ट्रवादीचे दोन असे विरोधी पक्षाचे एकूण आठ आमदार आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. जर या सूत्रानुसार निधी वाटप केला तर ९० टक्के निधी हा दोन आमदार असलेल्या गटांना आणि केवळ दहा टक्के निधी हा आठ आमदार असलेल्या विरोधी गटाला मिळेल. ही गोष्ट विरोधी पक्षातील आमदारांवर अन्यायकारक ठरेल. त्यामुळे विकासकामे कशी करायची, हा प्रश्न निर्माण होतो. याचा गांभीर्याने विचार व्हावा.
मुख्यमंत्री गट, भाजपला ८० टक्के निधी, मग आम्ही काय करायचे..? काँग्रेसच्या आमदारांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 6:22 PM