कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखांतील विविध पदव्यांच्या विषयांचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय अभ्यासमंडळाकडून घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने दि. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्याबाबत विविध अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालये कशी सुरू करावयाची, वर्ग कोणत्या पद्धतीने भरवायचे, विविध अभ्यासक्रम आणि परीक्षांचे वेळापत्रक स्वरूपाचे कसे राहणार याबाबतचा सविस्तर अहवाल प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे समितीने तयार केला. या अहवालाला विद्या परिषदेने मंगळवारी मान्यता दिली. शासन आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्यासही मान्यता दिली. विद्या परिषदेने शिफारस केलेला हा अहवाल आज, बुधवारी व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. विद्या परिषदेच्या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आदी उपस्थित होते.
चौकट
विद्यार्थ्यांची ५० टक्के उपस्थिती
महाविद्यालयात ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असावी. गर्दी होणारे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, आदी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे.