दशरथ आयरे
अणुस्कुरा : वय वर्ष ८०... मात्र, आजही पिढीजात सलून व्यवसायावरच पोटाची खळगी भरावी लागत असल्याने या वयातही थरथरणारे हे हात थांबले नाहीत; पण लॉकडाऊन केला अन् रोजीरोटीसह सगळेच हिरावून नेले... शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणच्या सत्तू नारायण रोकडे ऊर्फ सत्तूमामा या वृद्धाची जगण्याची धडपड लॉकडाऊनमुळे कशी थांबली, याचाच प्रत्यय देऊन गेली आहे. नित्यनिमाने सकाळी नऊ वाजता जवळच्याच वडाच्यावाडीतून डबा घेऊन सत्तूमामा करंजफेणला येतात. दरवाजा नसलेल्या, रात्रभर कुत्र्यांनी घाण
केलेल्या सलूनची स्वच्छता करून ते पोते अंथरतात... तेथून सुरू होतो त्यांचा केस कापण्याचा पिढीजात व्यवसाय. छोटा आरसा व दाढी कटींगचे साहित्य काढून ग्राहकाची वाट बघत बसतात. दरही अगदीच अल्प असल्याने शेतकरी-कामगार वर्ग सत्तूमामांचे हक्काचे ग्राहक आहेत. दिवसभर दहा- पंधरा जणांची दाढी-कटिंग केल्यानंतर दीड -दोनशे रुपये गाठीला बांधून थकल्या पावलांनी ते परत संध्याकाळी सहा वाजता घर गाठतात. असा त्यांचा चाळीस वर्षांपासूनचा दिनक्रम आहे.
सत्तूमामांना पाच मुली, या व्यवसायाच्या आधारावरच त्यांनी पाच मुलींचे विवाह लावून दिले. सलून व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे त्यांना आपला व्यवसाय वारंवार बंद करावा लागत आहे. व्यवसाय बंद झाला की घरात चूल पेटत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
चौकट : सलूनची अवस्थाही दयनीय : चार बाजूंनी खोके लावून वरती जुने पत्रे बसवले आहेत. पावसाळ्यात गळक्या पत्र्यातून सतत पाणी टिपकत असते. खाली जमिनीवर पोते टाकून दाढी -कटिंग करावी लागते. ओलसर जागा असल्यामुळे ग्राहक येत नसल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पानावल्या होत्या.
चौकट : घरासाठी शासन दरबारी हेलपाटे
आपले स्वतःचे एक घर असावे असे स्वप्न उराशी बाळगून सत्तूमामांनी मोठ्या अपेक्षेने घरकूल योजनेसाठी अर्ज केला. यासाठी शाहूवाडीला अनेक
हेलपाटेही मारले. मात्र, अद्यापह त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. आज ना उद्या हक्काचे घरकूल मिळेल या आशेवरच ते आला दिवस पुढे ढकलत आहेत.