सदाशिव मोरेआजरा -आजरा तालुक्यात गेल्या ४ दिवसात सरासरी ४३७ मि.मी.पाऊस झाला आहे. तर प्रती चेरापुंजी असलेल्या किटवडे येथील पर्जन्यमापक यंत्रात ८१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० वर्षात इतका उच्चांकी पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्याच पावसाने तालुक्यातील एरंडोळ व धनगरवाडी धरणे भरली आहेत.तर आजरा गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.कोल्हापूर व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला आजरा तालुक्यातील किटवडे हे गाव आहे.या परिसरात प्रतिवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी दररोज १५० ते २०० मि.मी. पाऊस पडतो.
चालू वर्षीही जून महिन्यात चार दिवस पडलेल्या उच्चांकी पावसाने धरणे भरली असून ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत.मुसळधार पडलेल्या पावसाने भात पेरणी व टोकणणी केलेल्या जमिनीत पाणी तुंबले आहे. तर आजरा परिसर व पश्चिम भागात भात रोप लागणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.किटवडे धनगरवाड्याच्या पठारावर प्रतिवर्षी कास पठाराप्रमाणे विविध प्रकारची फुलेही फुललेले असतात. या परिसरातील निसर्ग पर्यटकांना साद घालत असतो. पावसात ओलं चिंब भिजण्यासाठी पर्यटक प्रतिवर्षी येत असतात. मात्र कोरोनामुळे दोन वर्षात निसर्गाचा आस्वाद घेण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. दररोज पडणाऱ्या मुसळधार पावसाने या परिसरात भात व उसाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते.
प्रतिवर्षी अतिवृष्टीचा पाऊस व ऊसावर पडणारा तांबेरा रोग यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. अतिपावसाने हेक्टरी उसाचे उत्पादन कमी होते तर भाताचे उत्पादन चांगले येते मात्र त्याला दर मिळत नाही अशी विचित्र अवस्था आहे.
निसर्ग सौंदर्याने नटलेला व सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेले किटवडे, घाटकरवाडी, सुळेरान व आंबाडे हा परिसर पाहण्यासाठी प्रतिवर्षी पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी असते. आजरा - आंबोली मार्गावर घाटकरवाडी फाट्यापासून तीन कि.मी. अंतरावर किटवडे हे गाव असून अतिवृष्टी व फुलणाऱ्या फुलांमुळे काही तरुणांना रोजगारही मिळाला आहे.किटवडे परिसरात गेल्या चार वर्षात १६ ते १९ जून दरम्यान पडलेला पाऊस
- २०१८ - १२० मि.मी.
- २०१९ - ८० मि.मी.
- २०२० - २१० मि. मी.
- २०२१ - ८१६ मि. मी.
आजरा तालुक्यात गेल्या चार वर्षात 16 ते 19 जून दरम्यान पडलेला सरासरी पाऊस
- २०१८ - १२ मि. मी.
- २०१९ - ६ मि. मी.
- २०२० - १९० मि. मी.
- २०२१ - ४३७ मि. मी.
किटवडे परिसरातील जूनअखेरचा चार वर्षातील पाऊस
- २०१८ - ९१२ मि. मी.
- २०१९ - ४९१ मि. मी.
- २०२० - १४०६ मि. मी.
- २०२१ - १९४६ मि. मी. ( २० जून २०२१ अखेर ).