गडहिंग्लज :
महसूल लोकजत्रा उपक्रमाअंतर्गत रेशनकार्ड अद्ययावतीकरणासाठी आयोजित मंडलनिहाय विशेष शिबिराला गडहिंग्लज तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात मंडलात मिळून एकूण ८२५ शिधापत्रिकाधारकांनी शिबिराला उपस्थित राहून आपले अर्ज सादर केले.
मृत व्यक्ती आणि विवाह होऊन बाहेरगावी गेलेल्या मुलींची नावे कमी करणे व मुलांच्या विवाहानंतर कुटुंबात आलेल्या सुना, जन्माला आलेल्या मुला-मुलींची नावे वाढविण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना तालुक्याला यावे लागते. या कामासाठी त्यांना तहसील कार्यालयाला हेलपाटे मारावे लागू नयेत, म्हणून हे शिबिर घेण्यात आले. नाव कमी करण्यासाठी १८३, तर नाव वाढविण्यासाठी एकूण ६४२ अर्ज आले आहेत.
२०१३ मध्ये अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत शासनाने गरजू व पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली. त्यानुसार त्यांना नियमाप्रमाणे धान्याचे वाटप करण्यात येत आहे. तथापि, या यादीमधील काही लाभार्थी मृत झालेले आहेत. काही लाभार्थींच्या मुलींचे विवाह होऊन त्या बाहेरगावी गेलेल्या आहेत. त्यांची नावे यादीमधून कमी न झाल्यामुळे नियमाप्रमाणे देय धान्य वाटप करण्यात येत आहे. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अव्वल कारकून प्रकाश पाटील, मंडल अधिकारी आप्पा कोळी, म्हाळसाकांत देसाई, सुनीता शेळके, संभाजी माळी, बबन शिंदे व प्राची येसरे आणि महा ई-सेवा केंद्रांच्या प्रतिनिधींनी याकामी विशेष परिश्रम घेतले.
-
* मंडलनिहाय प्राप्त अर्जांची संख्या अशी
गडहिंग्लज (३८), नेसरी (४०), महागाव (१७), कडगाव (१६२), दुंडगे (१६९), नूल (२०६), हलकर्णी (१९३) एकूण ८२५. ------------------------------
* फोटो ओळी : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील शिबिरात पुरवठा अव्वल कारकून प्रकाश पाटील यांच्याकडे शिधापत्रिकाधारकांनी अर्ज सुपूर्द केले.
क्रमांक : २३०२२०२१-गड-०६