चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जगभरातील साखर उत्पादनात घट येण्याच्या शक्यतेने भारतीय साखरेला अन्य देशांतून मागणी वाढू लागली आहे. परिणामी महिन्याभरात सुमारे ८ लाख ३५ हजार टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. गेल्या संपूर्ण हंगामातही इतक्या साखरेची निर्यात झालेली नव्हती.जगभरातील साखर उत्पादनात घट होऊन ते मागणीपेक्षा थोडे फार जादा होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. उत्पादनातील ही तफावत सुमारे एक लाख टनांची आहे. त्यामुळे साखरेचे दर वधारण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापाऱ्यांकडून साखरेचे करार करण्यात येत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण, क्रुड तेलाच्या दरात होणारी वाढ यामुळेही साखरेच्या निर्यात कराराला प्राधान्य दिले जात आहे.परिणामी ८ लाख ३५ हजार टनांपैकी ९० टक्के साखर निर्यातीचे करार एक आॅक्टोबरनंतर झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व करार कच्च्या साखरेचे आहेत. हंगामाच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्यात करार होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आंतरराष्टÑीय बाजारात यंदा साखरेचा तुटवडा जाणवण्याच्या शक्यतेने साखरेचे दर वाढू लागले आहेत. यामुळेच सुमारे ८ लाख ३५ हजार टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. अशीच स्थिती राहिल्यास देशाचे ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होऊ शकेल.- प्रफुल्ल विठ्ठलानी,घाऊक व्यापारी, मुंबई
महिन्याभरात ८.३५ लाख टन साखर निर्यातीचे करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:09 AM