कोल्हापूर : कुटुंबावर झालेली करणी, काळी जादू, अघोरी शक्तीपासून मुक्त करण्यासाठी धार्मिक विधी, जागेचे शुद्धीकरण करण्यास सांगून वेळोवेळी ५४ लाखांची रोख रक्कम, ५९ तोळे सोने आणि चांदीचे दागिने, सागवानी वस्तू घेऊन येथील वृद्धाची ८४ लाख ६९ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी पथके संशयितांच्या गावी बारामतीकडे रवाना केली आहेत. सुभाष हरी कुलकर्णी (वय ७०, रा. दत्त गल्ली, गंगावेश, कोल्हापूर) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे.कुलकर्णी यांच्याकडून सोने, चांदीच्या वस्तू, बंदूक, जुने शिसम, सागवानी वस्तू, रोख रक्कम तर काही रक्कम आरटीजीएसने संशयितांनी आपल्या खात्यावर वर्ग केली आहे. ही घटना सन २०२३ ते ८ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत घडली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावेदादा पाटील (पाटणकर, पूर्ण पत्ता नाही), अण्णा ऊर्फ नित्यानंद नारायण नायक, सोनाली पाटील उर्फ धनश्री गणपत काळभोर, शशिकांत निळकंठ गोळे (वय ६९, सर्व रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती), पुंडलिक झगडे (रा. जेजुरी), तृप्ती मुळीक यांच्यासह अन्य तिघे अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला.
५९ तोळे सोने, चांदीचे दागिने लांबवलेकुलकर्णी यांच्याकडून सुमारे ५९ तोळे सोने त्यामध्ये सोन्याचा हार, दोन जानवी, बाजूबंद, तोडे, राणीहार, सोन्याचे कासव, पिंपळाचे पान, सोन्याची वडी, सोन्याचा नाग, नंदी, अंगठी याचा समावेश आहे. तर चांदीमध्ये पानाचा डबा, ताट, वाट्या, चांदीची नाणी यांचा समावेश आहे.