गारगोटी : नागणवाडी (ता.भुदरगड) येथे यात्रेनिमित्य केलेल्या प्रसादातून ८४ जणांना विषाबाधा झाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने गावातच उपचार केले. यापैकी दोघांवर गारगोटी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत. सौंदत्ती यात्रेहून गावी परतलेल्या भक्तगणांनी मंगळवारी (दि.१५) रोजी रात्री घरातून आंबील घुगर्यांचा प्रसाद करून तो एकत्रीत करून सर्वांना वाटला होता. रात्री हा प्रसाद घेतल्यानंतर पहाटेच्या सुमारास नागरीकांना उलट्या, जुलाब सुरु झाला.
याबाबतची माहिती आरोग्य विभागाला मिळताच पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. चंद्रकांत परूळेकर, डॉ. महेंद्र लवटे यांनी नागणवाडी गावातील विठ्ठल मंदीर व ग्रामपंचायतीमध्ये तातडीने उपचार केले. दोघावर गारगोटी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस निरीक्षक संजय मोरे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर, साथ रोग अधिकारी शुभांगी रेंदाळकर यांनी गावाला भेट दिली.