कोल्हापूर : अस्तित्वात नसलेल्या स्क्रॅप व्यवसायात गुंतवणुकीवर जादा परताव्याच्या आमिषाने तिघांची ८८ लाख ३५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाम्पत्याला अटक करण्यात आली. वर्षा सुरेंद्र पाटील व सुरेंद्र साहेबराव पाटील (दोघेही रा. रुईकर कॉलनी) अशी अटक केेलेल्या संशयित दाम्पत्याची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २५) पोलीस कोठडी सुनावली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रुईकर कॉलनी येथील वर्षा पाटील व सुरेंद्र पाटील या दाम्पत्याने प्रियतोष प्रताप भोसले (रा. मनीष कॉलनी, सरनोबतवाडी, ता. करवीर) यांना आपल्या घरी बोलावून त्यांच्याशी ओळख करून मैत्रीत रूपांतर केले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर, त्यांना गोवा येथे आमचा मलॉट फॅन्टसी रिसॉर्ट असल्याचे सांगितले. त्याच्या नूतनीकरणाचे काम तुम्हाला देतो असे सांगून मैत्री दृढ केली.त्यानंतर अस्तित्वात नसलेल्या स्क्रॅपच्या व्यवसायात पैसे गुंतवणुकीवर दरमहा ८० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर भोसले यांना त्या व्यवसायात ४० लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांपैकी सुमारे ४ लाख ५० हजार रुपये परत करून भोसले यांची ३५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली.याच पद्धतीने संशयित पाटील दाम्पत्याने संदीप दत्तात्रय बापट यांची २४ लाख रुपयांची, जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी यांची २८ लाख ८५ हजार रुपयांची अशी एकूण ८८ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. गुंतवणूक करणाऱ्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी करूनही ते परत न दिल्याने अखेर सर्वांच्या वतीने प्रियतोष भोसले यांनी पोलिसांकडे धाव घेऊन आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दिली.
शाहूपुरी पोलिसांनी तक्रार दाखल होताच संशयित वर्षा सुरेंद्र भोसले व सुरेंद्र साहेबराव भोसले या दाम्पत्याला बुधवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तक्रारीचे आवाहनअटक केलेल्या संशयित दाम्पत्याने अशाच प्रकारे आणखी कोणाची आर्थिक फसवणूक केली असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.