कोल्हापूर : जिल्ह्यात सन २०१४ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमनुसार दर एक हजार पुरुषांमागे मुलींचे प्रमाण ८८३ असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत ही माहिती देण्यात आली. ही बाब चिंताजनक असल्याने या यंत्रणेकडून दरमहा अहवाल यापुढे मागविण्यात येईल, तसेच नोंदणीकृत नसलेल्या सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करु, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर २०११ च्या जनगणनेनुसार ९५३ होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत त्यामध्ये तब्बल ७० ने घट झाली. इतकी घट होईपर्यंत जिल्हा आरोग्य यंत्रणा डोळे झाकून बसली होती का? अशी विचारणा आता या क्षेत्रातील जाणकारांकडून होत आहे.जिल्हास्तरीय गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निवड प्रतिबंध) म्हणजेच पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा दक्षता पथकाची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सैनी यांनी, गर्भपातासाठी कारणीभूत ठरणाऱ्या औषधांच्या सहज उपलब्धतेवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कठोर नियंत्रण आणण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व समूचित प्राधिकाऱ्यांच्या चार कार्यशाळा लवकरच घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सोनोग्राफी केंद्रांची सद्य:स्थिती, वैद्यकीय गर्भपात केंद्रांची सद्य:स्थिती, सोनोग्राफी सेंटर्स, वैद्यकीय गर्भपात केंद्र, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा आढावा घेतला.आजच्या बैठकीत जी माहिती दिली गेली ती २० ग्रामीण रुग्णालये व नऊ नगरपालिका कार्यक्षेत्रातील आहे. ती पूर्ण जिल्ह्याची माहिती आहे, असे म्हणता येत नाही. जनगणनेतील जन्मदर हा सर्वसाधारण गटातील असतो. आज दिलेली माहिती ही जन्मजात अर्भकांची आहे, त्यामुळेही संख्येत जास्त फरक दिसतो.- डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर प्रमुख जिल्ह्यांतील २०११ च्या जनगणनेनुसार मुलींचा जन्मदर असासिंधुदुर्ग- १०३७रत्नागिरी- ११२३सातारा- ९८६सांगली- ९६४कोल्हापूर- ९५३पुणे- ९१०मुंबई- ८३८
हजार पुरुषांमागे ८८३ मुलींचे प्रमाण
By admin | Published: June 24, 2015 12:32 AM