कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींपैकी ८९ टक्के रुग्ण हे व्याधिग्रस्त तसेच वयोवृद्ध होते आणि त्यांनी कोरोनाची लक्षणे जाणावायला लागल्यापासून चार ते पाच दिवस घरीच थांबून होते, असा निष्कर्ष महापालिका स्तरावर झालेल्या ‘डेथ ऑडिट’मध्ये नोंदविण्यात आला आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महानगरपालिका क्षेत्रात जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांत २७२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील १३६ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत झाले आहेत. कोरोनाचे बळी ठरलेल्या २७२ पैकी २४३ रुग्ण आधीच व्याधीग्रस्त होते. कोणाला दम्याचा त्रास होता, कोणाला मधुमेह होता. काहींना हायपरटेन्शन, सांधेदुखी, किडनी, एचआयव्ही, कॅन्सर अशा व्याधी होत्या. मृत झालेल्या व्यक्तींपैकी ४६ व्यक्तींचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल केल्यापासून ४८ तासांच्या आत झाला. उर्वरित सर्व मृत्यू हे ४८ तासांच्या पुढचे आहेत.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्यासह त्या-त्या रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, झोनल अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने ‘डेथ ऑडिट’ केले आहे. यावेळी उपायुक्त रवीकांत आडसुळे, शिल्पा दरेकर, निखिल मोरे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ उपस्थित होते.
लस न घेतलेले मृतांत जास्त
मृतांपैकी ८२ टक्के व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नव्हती. ४६ व्यक्तींनी केवळ पहिला डोस घेतला होता, अशी माहितीही बलकवडे यांनी दिली.
-संजीवनी अभियानाचा चांगला परिणाम -
महानगरपालिकेच्या १४० पथकांमार्फत शहरात दि.१६ एप्रिलपासून संजीवनी अभियान सुरू केले आहे तेव्हापासून दि. २४ मेपर्यंत २२ हजार ९६८ व्याधीग्रस्त व्यक्तींची तपासणी केली. त्यांच्यापैकी ७९६२ व्यक्तींच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १८५ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. २४७३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्ण शोधण्यात या अभियानाचा चांगला परिणाम दिसून येत असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. शहरात ५८ हजार २६२ व्याधीग्रस्त नागरिक आहेत, त्यांची जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
-शहरात म्युकरमायकोसिसचे सात रुग्ण-
शहरात म्युकरमायकोसिसचे एकूण सात रुग्ण आढळून आले असून त्यातील एक बरा होऊन घरी परतला आहे, उर्वरित सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीपीआरमध्ये एकूण अठरा रुग्ण असून त्यातील सहा जणांना डिस्चार्ज मिळाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पॉईटर -
- ऑक्सिजन बेड वाढविण्यास पालिकेचे प्राधान्य
- सोय असेल तरच यापुढे गृहअलगीकरण होणार.
- गतवर्षीच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट कमीच.
- दोन महिन्यांत ६७ हजार ५४२ कोरोना चाचण्या पूर्ण.
- त्यातून ७८०० बाधित रुग्ण सापडले.