कोल्हापूर- कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करत कोल्हापूर जिल्ह्यात ९ लाख ३३ हजार ७०३ बालक आणि युवकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १ ते ८ मार्च २०२१ या कालावधीत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अजूनही ज्या गावांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तेेथे ती पूर्ण करण्यात येणार आहे.
जंत संसर्गाचा त्रास होऊ नये यासाठी दरवर्षी शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने जंतनाशक गोळ्यांचे मोफत वितरण करण्यात येते. शाळा, अंगणवाड्यांमध्येच दरवर्षी या गोळ्या दिल्या जातात. परंतु सध्या शाळा, अंगणवाड्या सुरू नसल्याने अखेर घरोघरी जाऊन या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे.
१ ते २ वर्ष वयाच्या बालकाला एल्बेंडेझॉल ही ४०० मिलिग्रॅमची अर्धी गोळी देण्यात येते. तर २ ते १९ वर्षे वयाच्या मुला, मुलींना पूर्ण गोळी देण्यात येते. संसर्ग झालेले किंवा न झालेले बालक तसेच प्रौढ व्यक्ती या दोघांसाठी एल्बेंडेझॉल हे सुरक्षित औषध असून मातीतून संक्रमित झालेल्या कृमीरोगावर उपाय म्हणून ते जगभरातील लोकांना दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा वर्कर्स, आरोग्यसेवक, सेविका, अंगणवाडी कर्मचारी यांच्यावतीने हे गोळ्यांचे वाटप करण्यत येत आहे.
चौकट
अ.न. संस्था १ ते ६ वयोगटातील अपेक्षित ६ ते १९ वयोगटातील अपेक्षित एकूण लाभार्थी
१ कोल्हापूर महापालिका २५४५६ ९०५७४ १,१६,०३०
२ जिल्हा शल्य चिकित्सक
अंतर्गत कार्यक्षेत्र २९५५२ १,१९,२२८ १,४८,७८९
३ ग्रामीण कार्यक्षेत्र १,९८,०८३ ४,७०,८१० ६,६८,८९३
एकूण ९,३३,७०३
कोट
कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून सध्या घरोघरी या गोळ्यांचे वितरण केले जात आहे. केवळ गोळ्या घरात न देता त्या प्रत्यक्ष त्या मुलाने घेतल्याची खात्री केली जात आहे. त्यामुळे प्रक्रियेला थोडा वेळ लागत असला तरी ती पूर्ण केली जात आहे.
डॉ.योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी