कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ८.३३ ऐवजी नऊ टक्के बोनस व दोन ड्रेस (गणवेश) देण्याचा निर्णय बॅँक व्यवस्थापनाने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी बॅँक प्रशासन, कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘अनुकंपा’ कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लावण्याच्या हालचाली बॅँकेच्या पातळीवर सुरू आहेत.जिल्हा बॅँक सेक्शन ११/१ मध्ये गेल्यानंतर प्रशासकीय कार्यकाळ सुरू झाला आणि कर्मचाऱ्यांना बोनस, संलग्न संस्थांचा लाभांश बंद झाला. गेली बारा वर्षे कर्मचाऱ्यांना बोनस आणि संस्थांना लाभांश मिळालेला नाही. रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार संचित तोटा पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत लाभांश व बोनस देता येत नाही.
जिल्हा बॅँकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५७.५६ कोटींचा ढोबळ नफा झाल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानुसार बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस व संस्थांना आठ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली होती.कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांला दोन ड्रेस दिले जाणार आहेत. या ड्रेसचा रंगही निश्चित करण्यात आला असून गुलाबी शर्ट आणि काळी पॅँट राहणार आहे. संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला होता; पण ड्रेसची शिलाई बॅँकेने देण्याचा आग्रह कर्मचाऱ्यांनी धरला होता. ड्रेसची शिलाई देण्याऐवजी बोनसमध्येच ०.६७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. ‘अनुकंपा’चे ६० कर्मचारीही कामावर घ्यायचे आहेत, त्यांच्याबाबतही महिन्याभरात निर्णय होण्याची शक्यता आहे.