गडहिंग्लज : चंदगड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काढलेल्या विजयी मिरवणुकीत उत्साही कार्यकत्यांनी नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांच्यावर जेसीबीतून उधळलेल्या गुलालाने पेट घेतला. त्यामुळे आमदार पाटील यांच्यासह ६ पुरुष ३ महिला मिळून नऊजण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महागाव पंचक्रोशीसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील हे उघड्या जीपमधून मिरवणुकीने गडहिंग्लजहून चंदगडकडे निघाले होते.दरम्यान, महागाव येथील कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्यावर जेसीबीतून गुलालाची उधळण करीत असताना काही महिला पंचआरती ओवाळून त्यांचे औक्षण करीत होत्या. त्यावेळी आरतीवर पडणाऱ्या गुलालाने अचानक पेट घेतल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे मिरवणुकीतील लोक भीतीपोटी सैरावैरा पळून बाजूला गेल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेत सहा पुरुष व तीन महिलांच्या चेहरा व हाताला किरकोळ भाजले आहे. त्यापैकी काही पुरुष व महिलांवर महागाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. काहींच्यावर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाल्यामुळे पोलिसांनीही तत्काळ धाव घेतली. परंतु,रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.