राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्यातील ६ लाख ३०३ शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत घातलेल्या दुधापोटी १६५ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळवण्यात पुणे विभाग आघाडीवर राहिला असून, त्यापाठोपाठ नाशिक विभाग आहे.राज्यात गाय दूध अतिरिक्त झाल्याने खरेदी दर घसरले होते. राज्यात ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘राजारामबापू’ वगळता ३.५ फॅट आणि ८.५ एस. एन. एफ.साठी प्रतिलिटर ३३ रुपये कोणीच देत नाही. खासगी दूध संघ तर २५ ते २८ रुपये दराने खरेदी करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. डिसेंबरपासून गाय दूध दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीतील दूध खरेदीला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार या दोन महिन्यांत शासनाच्या निकषानुसार ६ लाख ३०३ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३३ कोटी लिटर गाय दूध अनुदानासाठी पात्र ठरले आहे. त्यापोटी १६५ कोटी रुपये मिळणार असून, त्यापैकी आतापर्यंत १८ कोटी १८ लाख १७ हजार ५ लिटर दुधाचे ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले आहे. उर्वरित अनुदान येत्या चार ते पाच दिवसात मिळणार आहे.
मुंढे यांच्यामुळे पात्र शेतकऱ्यांनाच लाभराज्याचे दुग्ध विभागाचे सचिव तुकाराम मुंढे हे दूध अनुदान खऱ्या शेतकऱ्यांनाच मिळाले पाहिजे, यासाठी पहिल्यापासून आग्रही होते. त्यानुसार सॉफ्टवेअर तयार करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केल्याने दूध उत्पादकांमध्ये समाधान आहे.
विभागनिहाय अनुदान असे मिळणारपुणे - ९५ कोटीनाशिक - ६२ कोटीऔरंगाबाद - ८ कोटीअमरावती - १ लाख ३० हजारकाेकण - ७ हजारनागपूर - ४७ लाख
राज्याचे दुग्ध सचिव तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दूध अनुदानाचे काम वेगाने व बिनचूक पूर्ण करण्यात आले. आतापर्यंत ९० कोटींचे अनुदान वर्ग झाले, तर उर्वरित अनुदान लवकरच जमा होईल. - प्रशांत मोहोड (आयुक्त, दुग्ध विभाग, महाराष्ट्र राज्य)