कसबा बावडा :
कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर जलतरण तलावासाठी शासनाकडून ९० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ.ऋतुराज पाटील यांनी दिली. याबाबत आ.पाटील यांनी क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांना पत्र पाठवून निधीसाठी विनंती केली होती. क्रीडा सुविधा निर्मिती धोरण अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. या जलतरण तलावासाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च अपेक्षित असून राज्य शासनाने क्रीडा धोरणानुसार ७५ टक्के अनुदान दिले आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा बावडा मैदानाचा विकास सुरू आहे. या मैदानावर रात्री खेळण्यासाठी फ्लड लाईटची व्यवस्था, अद्ययावत बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलिबॉल कोर्टची उभारणी, खेळांसोबतच कबड्डीसाठी सिंथेटिक फ्लोअर बसवणे, याशिवाय खो-खो, रनिंग ट्रॅक, लांबउडी यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करणे तीन हजार चौरस फुटाचा बॉक्सिंग हॉल उभारणे, दिव्यांगांसाठी हॉल, सुविधा उपलब्ध करणे, वॉकिंग ट्रॅक डागडुजी, स्टेज कव्हर सीटिंग बैठक व्यवस्था आणि सुशोभिकरणासाठी मैदानावर नैसर्गिक आणि आर्टिफिशअल लॉन उभारणे आदी कामांचा समावेश आहे.
कसबा बावडा परिसराची लोकसंख्या १ लाखांवर असून या भागातील नागरिकांना लाभ होण्याबरोबरच खेळाडूंनाही मदत होणार आहे.
या मैदानावर महाराष्ट्र विद्यालयनजीक जलतरण तलाव बांधणे प्रस्तावित असून त्यासाठी १कोटी २० लाख खर्च अपेक्षित आहे.