कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ११ राज्य मार्ग व ३७ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ४८ मार्ग बंद झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी धान्यांसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवला आहे. पावसाळ्यापूर्वीच पुरेसा धान्य साठा केल्याने नागरिकांना धान्य तुडवड्याची काळजी नाही. काही व्यापाऱ्यांच्या मार्केट यार्डातील गोदामात हा साठा पुरेसा आहे. मात्र, राज्यातील पूरस्थितीचा अंदाज घेऊन ट्रक आणि टेम्पो वाहतूक ९० टक्के बंद आहे. आंतरराज्य वाहतुकीसाठी चालकच तयार नसल्याने ही वाहतूक थांबली आहे.अतिवृष्टीमुळे राज्यात ठिकठिकाणी प्रवासी आणि मालवाहतूक बंद आहे. कोल्हापूरच्या धान्य बाजारपेठेत लातूरवरून तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळीसह सर्व प्रकारच्या डाळींची आवक होते. मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गहू येतो. कर्नाटकातील तेंदनूर, रायचूर परिसर आणि नाशिक, नागपूर परिसरातून तांदूळ आवक केला जातो. कोल्हापुरातून गोवा, कोकण, कर्नाटकात धान्य, साखर, सर्व प्रकारची कडधान्ये, भाजीपाला वाहतूक केली जाते. अद्याप राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुुरू असल्याने माल पाठवण्यास किंवा आणण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. कोकणात जाणारी वाहतूक मात्र पर्यायी मार्गे वळविली आहे.
मालवाहतुकीची चाके थांबलीकोल्हापुरातून राजस्थान आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणातून मालवाहतूक होते. दोन्ही राज्यांत आवक-जावक होते. राजकोट, सुरत, अहमदाबाद, मोरवी, पाली, जोधपूरसह परिसरातील १० हून अधिक शहरात साखर पाठवली जाते. उद्योगाला लागणारे स्पेअर पार्टची निर्यात होते. इचलकरंजी येथे तयार होणारे कापडही राजस्थानला जाते. या रोज ५० हून अधिक जाणारे मालवाहतुकीचे केवळ १० ट्रक जात आहेत.
१६ हजार ट्रक आणि ३ हजार टेम्पोकोल्हापूर जिल्ह्यात ट्रकची संख्या १६ हजार आहे. पैकी ४ हजारांहून अधिक ट्रक मालवाहतूक करतात. त्यात ७ टनांच्या आतील टेम्पो (आयशर)ची संख्या ३ हजार आहे. कोल्हापूर, गांधीनगर, इचलकरंजीतून आंतरराज्य मालाची वाहतूक करणारी ट्रकही मोठ्या संख्येने आहेत.
धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पावसाळ्यापूर्वी बहुतांशी व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक लागणारे सर्व साहित्य आयात केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नाही. -वैभव सावर्डेकर, संचालक, धान्य व्यापारी संघटना
गुजरात, राजस्थानसह अन्य ठिकाणी जाणारी मालवाहतूक बंद आहे. अतिवृष्टीमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन वाहनावर चालक जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे मालवाहतूक थांबली आहे. - भाऊ घोगळे, उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशन
खाद्यतेलाचा पुरेसा साठा कोल्हापुरात उपलब्ध आहे. जरी आवक बंद झाली तरी वर्षभर पुरेल इतका खाद्यतेलाचा साठा आहे. - प्रदीपभाई कापडिया, अध्यक्ष, किराणा असोसिएशन आणि तेल व्यापारी