कोल्हापूर : जिल्ह्यातील ९४० माध्यमिक शाळांनी इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी असल्याचे सांगत, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. पालकसंमती व दक्षता समित्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घ्या, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोराेनामुक्त गावांतील ३७ शाळा दोन दिवसात सुरू होत आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा बंदच आहेत. संसर्ग जास्त असल्याने शाळा सुरूच करू नयेत असे राज्यस्तरावरील आदेश असले तरी, ९ वी आणि १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांकडून शाळा सुरू करण्याबाबत दबाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार ५४ माध्यमिक शाळांतील ९४० शाळांनी, आपण सर्व काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास तयार आहोत, असे शिक्षणाधिकाऱ्यांना कळवले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने तयार केलेल्या लिंकमध्ये देखील या शाळांनी ९ वी, १० वी चे वर्ग भरवण्यास सर्वांची संमती असल्याचे नमूद केले आहे.
पालकांची संमती बंधनकारक
९ वी व १० वीचा अभ्यासक्रम क्लिष्ट असल्याने तो ऑनलाईन पध्दतीने करताना मुलांची दमछाक होत आहे. वर्गात लक्ष लागते, तसे ऑनलाईनमध्ये लागत नसल्याची पालकांचीही तक्रार आहे. या सर्वांची दखल घेऊनच वर्ग भरवण्याची तयारी केली जात आहे, पण यासाठी पालकांकडून संमतीपत्र लिहून घेणे बंधनकारक केले आहे.
दोन दिवसात ३७ शाळा सुरू होणार
जिल्ह्यात आजच्या घडीला १०० गावे कोरोनामुक्त आहेत. या ठिकाणी कोठेही कोविड सेंटर नाही, एकही रुग्ण नाही. अशा ठिकाणी सर्व दक्षता घेऊन शाळा सुरू करण्याला प्राधान्य राहणार आहे. पहिल्या टप्प्यात त्यातील ३७ शाळा दोन दिवसात सुरू होत आहेत. तसेच आदेश मंगळवारी रात्रीच शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये आता वर्ग भरवण्यापूर्वी सॅनिटाईज करण्यासह अन्य सुरक्षा उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे.
प्रतिक्रिया...
अजूनही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नसल्यामुळे शाळांची तयारी असली तरी, पालकांची संमती आहे का, दक्षता समितीचे काय म्हणणे आहे, याचा विचार करूनच शाळा पातळीवर निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली आहे.
- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी