कोल्हापूर : ट्रकचालकांना हमाली देणे परवडत नाही. यासोबतच ट्रकचा थर्ड पार्टी विमा काढायचा व ट्रकमधील मालाचा विमाही द्यायचा; त्यामुळे हा एकूण व्यवसायच करणे परवडत नसल्याने येत्या ९ आॅगस्टपासून ‘ज्याचा माल, त्याचा हमाल,’ ‘ज्याचा माल, त्याचा विमा’ असा निर्णय लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शाहूपुरीतील वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या हॉलमध्ये झालेल्या या बैठकीस कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, निपाणी, आदी ठिकाणांचे लॉरी आॅपरेटर्स, ट्रकमालक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव होते.ट्रक आणि टेम्पोचालक, मालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी (दि. २६) व्यापक बैठक घेण्यात आली होती. यावेळी तिन्ही जिल्'ांतील असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी सायंकाळी बैठक झाली. यात कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, निपाणी, आदी येथील ट्रकचालक, मालक सहभागी झाले होते.
हमालीचे पैसे, डिझेलचे वाढलेले दर, ट्रकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स, ट्रकचा मेंटेनन्स याच्या खर्चाचा मेळ बसत नाही. या सगळ्याच्या तुलनेत भाडेदर मात्र कमी आहेत. त्यामुळे परराज्यातील एका खेपेमागे केवळ दोन-अडीच हजारांवर समाधान मानावे लागते. त्यामुळेच येथून पुढे हमाली आणि मालाचा इन्शुरन्स माल भरणाऱ्या मालकानेच द्यायचा, अशी भूमिका सर्वांनी घेतली. या निर्णयाची अंमलबजावणी ९ आॅगस्टपासून होणार आहे.
हा निर्णय एकमताने घेण्यात आला. यासाठी मंगळवारी (दि. ३०) शाहूपुरी कार्यालयातून मोर्चाने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. सर्व व्यापारी आणि उद्योजकांच्या संघटनांना बुधवारी (दि. ३१) निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर ९ आॅगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जो व्यापारी, उद्योजक याला विरोध करील त्याच्या दारात असोसिएशन आंदोलन करील, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, भाऊ घोगळे, जगदीश सोमय्या, गोविंद पाटील, संदीप मोहिते, प्रदीप शेवाळे, महादेव माने, अल्ताफ सवार, मन्सूर मोदी, राहुल पुजारी, परशुराम सूर्यवंशी (सर्व -कऱ्हाड ), जिल्हा वाळू वाहतूक संघटनेचे विजय पाटील, भाई पटवेगार, अतुल जाधव यांच्यासह ट्रकचालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.