कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथील हरिदासकी नावाच्या शेतातील ओढ्यात गुरुवारी (दि. २२) सकाळी दहा वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला. पीडित बालिकेच्या नराधम नातेवाइकानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. पीडित मुलगी बिहारी मजूर दाम्पत्याची आहे. कोलकाता आणि बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतर शिये येथील घटनेने महाराष्ट्र हादरला. पोलिसांनी अवघ्या आठ तासांत गुन्ह्याचा उलगडा करून दिनेशकुमार केसनाथ साह (वय २५, रा. बिहार) या आरोपीस अटक केली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील एक दाम्पत्य गेल्या तीन वर्षांपासून शिये येथे राहते. त्यांना तीन मुली आणि दोन मुले आहेत. बुधवारी सकाळी दाम्पत्य रत्ना उद्योग येथे कामासाठी गेले. त्यावेळी पीडित मुलीचा लांबचा नातेवाईक दिनेशकुमार साह घरात होता. त्याला मुलींकडे लक्ष ठेवण्यास सांगून दाम्पत्य कामासाठी निघून गेले. सायंकाळी पीडित मुलीचा मामा कामासाठी घरातून बाहेर पडला. रात्री तिचे आई-वडील घरी परतल्यानंतर मोठी मुलगी घरात नसल्याचे लक्षात आले. रात्री नऊपर्यंत मुलगी सापडत नसल्याने परिसरातील नागरिकांनीही शोधमोहीम सुरू केली.दरम्यान, वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांसह स्थानिकांनी पहाटे चारपर्यंत मुलीचा शोध घेतला. मात्र, तिचा काहीच सुगावा लागला नाही. गुरुवारी सकाळी श्वानपथकाने माग काढला असता, घरापासून सुमारे ८०० मीटर अंतरावर हरदासकी नावाच्या शेतातील ओढ्यात मुलीचा मृतदेह आढळला.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवला. घटनास्थळी मुलीचे अंतरवस्त्र, चप्पल पडले होते. तिच्या अंगावर ओरखडे उठले होते. फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळावरून काही नमुने जमा केले.असा झाला उलगडामृतदेह आढळताच पोलिसांनी परिसरातील दीड किलोमीटर अंतरातील ९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. त्यावरून पीडित मुलीच्या नातेवाइकासह सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. साडेपाच तास चौकशी केल्यानंतर अखेर दिनेशकुमार साह याने गुन्ह्याची कबुली दिली. बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान त्याने गुन्हा केल्याचे चौकशीत सांगितले.
लैंगिक अत्याचार अन् गळा आवळून खूनसीपीआरमधील चार डॉक्टरांच्या उपस्थितीत पीडित मुलीच्या मृतदेहाची इनकॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यात आली. लैंगिक अत्याचार करून गळा आवळून आणि लाथाबुक्क्या मारून तिचा खून केल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.गुन्हा करून मुलीच्या शोधात पुढेनराधम साह याने अतिशय थंड डोक्याने मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर घरात येऊन तो रात्रपाळीच्या कामासाठी निघून गेला. सकाळी आठ वाजता कामावरून परत आल्यानंतर तो मुलीचा शोध घेण्यात पुढे होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तो तीन महिन्यांपूर्वीच शिये येथे आला असून, पीडित मुलीचे वडील काम करीत असलेल्या रत्ना उद्योग कंपनीत तो काम करीत होता.
पोलिसांची तत्परताकोलकाता आणि बदलापूर येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर शिये येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, करवीरचे उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.डोळा, डोक्याला इजाआरोपीने खून केल्यानंतर मुलीला जवळच्या ओढ्यात फेकले होते. त्यामुळे तिच्या डोक्याला इजा झाली होती. तिचा एक डोळाही बाहेर आल्याचे दिसत होते. पाठीवर आणि हातांवर मारहाणीचे व्रण होते. अंतर्गत जखमांची माहिती पीएम रिपोर्टनंतर मिळेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
तपासासाठी एसआयटीगुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. या विशेष तपास पथकात दोन महिला उपनिरीक्षक, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागातील दोन कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवणारलवकरात लवकर आरोपीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करून त्याला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
शिवसेनेची निदर्शनेउद्धव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संजय पवार, विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवत सीपीआरमध्ये निदर्शने केली. शिवविच्छेदन विभागासमोर घोषणाबाजी केल्यानंतर कार्यकर्ते सीपीआर चौकात पोहोचले. रस्त्यात निदर्शने करून त्यांनी अपघात विभागाबाहेर ठिय्या मारला. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.