सदाशिव मोरे आजरा : आजरा - गांधीनगर रस्त्यावरील १५० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला आहे. मुसळधार पडणारा पाऊस व जोरदार सुटलेला वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे रस्त्यावरून उन्मळून पडली आहेत. महाकाय वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चित्री प्रकल्पासह एरंडोळ, पोळगाव, लाटगाव, खानापूर, विटे, देऊळवाडी या मार्गावरील वाहतूक आजरा शहरातून वळविली आहे. वटवृक्ष कोसळला त्याच्या शेजारीच घर आहे. मात्र वटवृक्ष बाजूला कोसळल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.चित्रीसह सर्वच धरणे तुडुंब आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला चित्री मध्यम प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरला आहे. चित्री धरणात १६८६ द.ल.घ.फू. पाणीसाठा झाला आहे. सांडव्यावरुन ४०० क्युसेक्सने तर चित्री धरणाच्या गेटमधून विद्युतगृहासाठी १८० क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. पाण्यावर दररोज दोन मेगावॅट विद्युत निर्मिती होत आहे. यापूर्वी आंबेओहोळ, सर्फनाला, एरंडोळ, धनगरवाडी, खानापूर हे लघु पाटबंधारे प्रकल्पही पूर्ण भरले आहेत. उचंगी धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने हिरण्यकेशी नदीला महापूर आला आहे. अद्यापही जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने हिरण्यकेशी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर चित्री धरणासह अन्य धरणांवर पर्यटनाला जाण्यास बंदी घातली आहे. धरणे भरल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. चित्री धरणासह सर्वच धरणे गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ दिवस अगोदरच भरली आहेत.
Kolhapur: आजरा-गांधीनगर रस्त्यावर १५० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला, वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 3:58 PM