दीपक जाधवकदमवाडी : कोरोनाकाळात गोरगरीब रुग्णांचे आधारवड ठरलेल्या सेवा रुग्णालय परिसरात ५० बेडचे ट्रामा केअर सेंटर मंजूर झाले असून, यामुळे जिल्ह्यातील अपघातग्रस्त व तातडीने उपचाराची गरज असलेल्या रुग्णांची सोय होणार आहे.जिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. जिल्ह्यातून ४४ किलोमीटरचा पुणे-बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग जात असून, त्याचबरोबर इतर महामार्गांबरोबर रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. सध्या बहुतांश प्रमुख रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झाले असल्याने वाहनेही सुसाट जातात. त्यामुळे जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे तरी रस्ते अपघात हे ठरलेले असतात. अपघातानंतर पहिल्या एका तासात गंभीर रुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक असते. त्या गोल्डन अवरमध्ये मिळालेल्या उपचाराने अनेक अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचतात.अशा रुग्णावर वेळेत आणि योग्य उपचार व्हावेत म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने लाइन बझार येथील सेवा रुग्णालय परिसरात चार मजली इमारतीमध्ये ५० बेडच्या ट्रामा केअर युनिटला मंजुरी दिली असून त्याच्या बांधकामासंबंधीच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. ५० बेडच्या ट्रामा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्त, सर्पदंश किंवा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रुग्णांना तातडीने उपचाराची सोय होणार आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात २० खाटांचे ट्रामा केअर युनिट असून, होणारे अपघात पाहता ते अपुरे पडत आहे. सध्या कोल्हापूरला जिल्हा रुग्णालय नाही त्यात वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रामा केअरमधील उपलब्ध अपुरे खाट व येणारे रुग्ण जास्त असल्याने गरीब, गरजू रुग्णांची परवड होत आहे.
सेवा रुग्णालय परिसरातील मोकळ्या जागेत हे ५० खाटांचे ट्रामा केअर युनिट उभारण्यात येत असून, यामुळे अनेक गरजू, गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार होण्यास मदत होणार आहे. - डाॅ.दिलीप माने, आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर