पन्हाळा : राजा शिवछत्रपती कोल्हापूर परिवार या दुर्ग स्वच्छ करणाऱ्या संस्थेस आंधारबाव तटबंदीत लोखंडी तोफगोळा सापडला, त्याचे वजन ७ कि. ग्रॅम भरले.
राजा शिवछत्रपती कोल्हापूर परिवार ही संस्था २०१४ पासून महाराष्ट्रभर दुर्गसंवर्धनाचे काम करीत आहे. त्याच परिवाराचा एक विभाग दर महिन्याच्या एका रविवारी किल्ले पन्हाळगड येथे गडस्वच्छता व संवर्धन मोहीम राबवत असताना आंधारबाव परिसरातील तटबंदीमध्ये एक लोखंडी तोफगोळा सापडला.
या मोहिमेत एकूण शंभर मावळे, रणरागिणी उपस्थित होते. त्यांनी हा तोफगोळा पुरातत्त्व विभागाकडे जमा केल्याचे संस्थेचे सदस्य मोहन कोकणे, विजय जगदाळे, रत्नाकर गायकवाड यांनी सांगितले.गेल्या वर्षी या संस्थेला पुसाटी बुरुज परिसरात लोखंडी तोफगोळा सापडला होता. पुन्हा तोफगोळा मिळाल्याने पुरातत्त्व विभागाने संशोधन करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. १८४४ साली इंग्रजांनी संपूर्ण पन्हाळा गड येथील तटबंदी व इमारती पाडण्याच्या उद्देशाने हे तोफगोळे डागले होते. इतिहास संशोधकांनी या तोफगोळ्याचा अभ्यास करण्याची गरज असल्याची पन्हाळ्यातील नागरिकांची मागणी आहे.