कोडोली : कोडोली मंडळ कार्यक्षेत्रातील खरेदी केलेल्या जमिनीचे सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केलेप्रकरणी कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित नारायण पवार (सध्या रा. कोल्हापूर) यांच्या विरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी एजंट / पंटर रणजीत आनंदराव पाटील (रा. कोडोली) यास पोलिसांनी अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, यातील मूळ तक्रारदार यांनी काकांनी खरेदी केलेली शेतजमीन सातबारा पत्रकी नोंद करणे करीता मंडल अधिकारी पवार यांच्याकडे संपर्क साधला होता. पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजाराची मागणी केली होती. या प्रकरणी १५ हजार रुपये देणेबाबत तडजोड झाली होती. या प्रकरणी एजंट / पंटर रणजीत पाटील यांनी मंडल अधिकारी तुमच्याकडून पैसे घेणार नाहीत, माझ्याकडे द्या असे सांगितले. सदर रक्कम पाटील यांच्याकडे देण्यास मंडल अधिकारी पवार यांनी सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार याने डिसेंबर २०२३ मध्ये तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. मंडल अधिकारी पवार यांना अद्याप अटक झालेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी, पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, स.पो. नि. प्रकाश भंडारे, हवालदार अजय चव्हाण, सुधीर पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक बापूसो साळुंखे करीत आहेत.
Kolhapur: सातबारा नोंदीसाठी मागितली १५ हजाराची लाच, कोडोलीच्या मंडल अधिकाऱ्यांवर गुन्हा; पंटरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 1:30 PM