समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून वितरित करण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारातील स्वयंपाक्यांच्या मानधनातील काही रक्कम नातेवाइकांच्या खात्यावर वळवण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली असून नेमके किती पैसे वळवण्यात आले आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे. यामुळे या विभागातील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे.
यातील गैरव्यवहारावरून बुधवारी सकाळी लेखाधिकारी दीपक माने यांचे अपहरण करून त्यांना मारहाण झाल्याचा गुन्हा शाहुपुरी पोलिसांत दाखल झाला आहे. अपहारातील २३ लाख भरण्यासाठी दबाव असल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. संशयित आरोपीमध्ये जिल्हा परिषदेचे एक कर्मचारी आहे.केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतून जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शंभर टक्के अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांना पोषण आहार वितरित करण्यात येतो. यामध्ये अंडी, केळी, खिचडीचा समावेश असतो. आठवड्यातून एकदा राजगिऱ्याचे लाडू, चिक्कीही दिली जाते. अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये तर बेदाण्यांसारखा सुकामेवाही दिला जातो.
हा पोषण आहार तयार करण्यासाठी प्रत्येक शाळेत स्वयंपाकी तथा मदतनीस नेमला जातो. त्याला महिन्याला २,५०० रुपये मानधन देण्यात येते. या विभागाकडे महाराष्ट्र वित्त व लेखा विभागाकडील लेखाधिकारी कार्यरत असतात. दीपक बाळासाहेब माने हे या ठिकाणी लेखाधिकारी आहेत. तेजस्विनी साठे या येथे कंत्राटी पद्धतीने डेटा एन्ट्री ऑपरेटर आहेत.स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे वर्षाला १ कोटी ५२ लाख, २५ हजार रुपये मानधन काढण्यात येते. परंतु अनेकदा हे स्वयंपाकी बदलले जातात. त्यामुळे त्यांच्या बँकेतील खात्यांचे नंबर हे नव्याने घ्यावे लागतात. मोठ्या संख्येने असणाऱ्या स्वयंपाक्यांपैकी काहीजणांच्या खात्याचे नंबर चुकीचे असल्याने काहीजणांचे मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा न होता पुन्हा जिल्हा परिषदेकडे येते. हेच पुन्हा आलेले मानधन संबंधितांनी आपल्या नातेवाइकांच्या खात्यांवर वळवल्याचा संशय आहे. या भानगडीमध्ये नेमके कोण आहे हे मात्र चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे.
नवीन चौथा मजला आला चर्चेतया विभागामध्ये कार्यरत असलेल्या तेजस्विनी साठे दोन दिवस विनापरवानगी रजेवर असल्याचे सांगण्यात आले. माने हे निवडणूक कामासाठी नियुक्त असल्याने तेदेखील दोन, तीन दिवस जिल्हा परिषदेकडे फिरकलेले नाहीत. आज हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे या विभागाच्या दालनात सन्नाटा होता. एक, दोन कर्मचारी होते. अशातच प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर या मुलाच्या विवाहानिमित्त रजेवर असून योजना विभागाच्या अधिकारी अनुराधा म्हेत्रे यांच्याकडे कार्यभार आहे.