कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागातील कंत्राटी प्राध्यापक डॉ. शैलेश रमाकांत वाघमारे (वय ३८, मूळ रा. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. मोरेवाडी, ता. करवीर) यांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. २१) रात्री उशिरा त्यांचा मृतदेह राजाराम तलावात आढळला. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी प्रा. वाघमारे यांच्याकडे पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा. वाघमारे गेल्या १२ वर्षांपासून शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागात कंत्राटी पद्धतीने सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत होते. पत्नीची मणक्याची शस्त्रक्रिया करायची असल्याने त्यांनी २३ फेब्रुवारी ते एक मार्चदरम्यान विभागातून रजा घेतली होती. मंगळवारी रात्री आठपर्यंत ते मायक्रोबायोलॉजी विभागात होते.त्यानंतर त्यांचा मोबाइल स्विचऑफ लागत असल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. प्रा. वाघमारे बेपत्ता असल्याचे समजताच विद्यापीठातील त्यांच्या मित्रांनीही शोधाशोध सुरू केली.रात्री उशिरा राजाराम तलावाजवळ एका विद्यार्थ्याला प्रा. वाघमारे यांची दुचाकी दिसली. त्यानंतर विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह तलावात पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली.पोलिसांना मिळाली सुसाइड नोटप्रा. वाघमारे यांच्याजवळ पोलिसांना सुसाइड नोट मिळाली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख प्रा. वाघमारे यांनी त्यामध्ये केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. ते मोरेवाडी येथे कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे.
आर्थिक विवंचनाप्रा. वाघमारे यांना वर्षातील ११ महिने दरमहा ३२ हजार रुपयांचे वेतन विद्यापीठाकडून मिळत होते. गेली १२ वर्षे त्यांनी तासिका तत्त्व आणि कंत्राटी पद्धतीने काम केले. पूर्णवेळ प्राध्यापक भरतीची संधी मिळत नसल्याने त्यांना तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत होता. याच विवंचनेतून त्यांनी जीवनयात्रा संपवली.