बेळगाव : पश्चिम घाटात होणाऱ्या दमदार पावसामुळे नैर्ऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील ब्रागांझा घाट प्रदेशातील दूधसागर-सोनावळी दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा ठप्प झाल्याची घटना काल, रविवारी घडली. त्यानंतर दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. मात्र, दूधसागर धबधबा पाहण्यास गेलेल्या पर्यटकांसह रेल्वे प्रवाशांचे हाल झाले.दूधसागर व कॅसलरॉक परिसरात काल रविवारी मुसळधार पाऊस झाला. परिणामी सायंकाळी दूधसागर-सोनावळी दरम्यानच्या टनेल क्र. १२ नजीक रेल्वे रुळावर दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. हा संपूर्ण घाट परिसर असल्याने दरड हटविण्याच्या कामाला वेळ लागत होता. नैर्ऋत्य रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग दरड हटविण्यासाठी कार्यरत होता.रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे क्र. १२७७९ वास्को -निजामुद्दीन गोवा सुपरफास्ट एक्स्प्रेस सोनावळी रेल्वे स्थानकातच थांबविण्यात आली होती. दरड हटविण्याचे काम पूर्ण होताच रात्री या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती नैर्ऋत्य रेल्वेचे जनसंपर्कप्रमुख अनिश हेगडे यांनी दिली.
पावसामुळे दूधसागरनजीक रेल्वे मार्गावर कोसळली दरड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 7:37 PM