जोतिबा : जोतिबा डोंगरावर माघ महिन्यातील पोळ्याच्या पौर्णिमेला हजारो भाविकांनी जोतिबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली. रविवार आणि पौर्णिमा एकाच दिवशी आल्याने जोतिबा मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. मंदिरासभोवती दर्शन रांगा लागल्या होत्या. दुपारी बारानंतर दर्शन राग मंदिराबाहेरील ठाकरे मिटके मार्गापर्यंत पोहचली होती. स्थानिक पुजारी, महिला वर्गानी आंबील घुगऱ्याचा नैवेद्य दाखविला. रविवारी जोतिबा देवाची आलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. साडे अकरा वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी देव सेवक, श्रींचे पुजारी, उंट-घोडे, वाजंत्रीच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघाला. यावेळी भाविकांनी चांगभलंच्या गजरात गुलाल खोबऱ्यांची उधळण केली. रात्री ८ वाजता पालखी सोहळा निघाला.माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून जोतिबा खेटेला प्रारंभ होतो. १२ फेब्रुवारीला जोतिबा देवाचा पहिला रविवार खेटा होणार असून पुजारी, प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. कोल्हापूर ते जोतिबा डोंगर अशा पायी प्रवासाने रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. कोल्हापूरच्या श्री अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत .
Kolhapur News: जोतिबावर पोळ्याच्या पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी, १२ फेब्रुवारीला पहिला खेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 2:00 PM