कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञानामध्ये पाण्यावरील हायड्रोपोनिक शेती हा पारंपरिक माती-आधारित शेतीला शाश्वत पर्याय म्हणून समोर येत आहे. या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांनी हायड्रोपोनिक प्लांटेशन हेल्थ मॉनिटरिंग मशीन या अभिनव संशोधनासाठी भारतीय पेटंट मिळवले. डॉ. सुनीता जाधव (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बु.), डॉ. सुजीत जाधव (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, श्रीमंत भय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड), डॉ. शिवराज थोरात (सहाय्यक ग्रंथपाल, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र, शिवाजी विद्यापीठ), ऋतुराज जाधव (संगणक अभियंता), गजानन मोहिते (जयवंतराव भोसले कृषी महाविद्यालय, रेठरे बु.) आणि प्रा. अविनाश कणसे (भारती विद्यापीठ, पुणे) यांनी हे हायड्रोपोनिक प्लांटेशन हेल्थ मॉनिटरिंग मशीनचे डिझाइन यशस्वीरीत्या तयार केले.हायड्रोपोनिक म्हणजे फक्त पाण्याचा वापर करून केलेली शेती. या हायड्रोपोनिक शेतीची कार्यक्षमता, उत्पादकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. प्रगत सेन्सर्स, रिअल-टाइम डेटा ॲनालिटिक्स आणि स्वयंचलित नियंत्रण प्रणालींमुळे हे यंत्र पिकांचे आरोग्य, वाढ, बदलत्या परिस्थितीचे निरीक्षण, व्यवस्थापन करते. हायड्रोपोनिक शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकते. यामध्ये वनस्पतींना आवश्यक असणारी मूलद्रव्ये पाण्यासोबत दिली जातात.कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के. प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी या संशोधकांचे अभिनंदन केले.
शेतीला शाश्वत पर्याय, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी बनवले पाण्यावरच्या ‘हायड्रोपोनिक’ मशीनचे डिझाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 5:00 PM