कोल्हापूर : नामांकित सिमेंट कंपनीचा विक्री प्रतिनिधी असल्याचे भासवून कसबा बावड्यातील एका डाॅक्टरची स्वस्त सिमेंट देतो असे सांगून ११ लाख ४७ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी प्रेमकुमार साह (रा. बनारहट, जलपाईगुडी पश्चिम बंगाल) या संशयितांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.पोलिसांनी सांगितले, फिर्यादींचे हलकर्णी (ता. चंदगड) एम.आय.डी.सी. येथे रुग्णालयाचे बांधकाम सुरु आहे. त्यांना १७ फेब्रुवारी ते १३ जुलै २०२२ अखेर फसविण्याच्या इराद्याने प्रेमकुमार साह याने आपले नाव नितीन कुमारसिंग असे खोटे सांगून संपर्क साधला व खरी आपली ओळख लपवली. आपण एका नामांकित सिमेंट कंपनीत प्रतिनिधी बोलतोय असे खोटेच सांगून फिर्यादीस कमी दरात सिमेंट देण्याचे आमिष दाखविले.त्यानुसार डॉक्टरांनी एनईएफटीद्वारे ११ लाख ४७ हजार ५०० रूपयांची रक्कम त्याला वेळोवेळी पाठवली. प्रत्येक वेळी सिमेंट पाठवून देतो असे आश्वासन तो देत होता. पण अखेरपर्यंत सिमेंटचा ट्रक काही आला नाही म्हणून फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी फिर्याद दिली.नव्या पद्धतीला सुशिक्षितही फसतातऑनलाइन फसवणुकीच्या रोज पद्धती बदलत आहेत. लुटारू लोक रोज नवाच फंडा शोधून काढत आहेत. त्याच्या फसवणुकीच्या बातम्याही रोज वृत्तपत्रांत ठळकपणे येतात. तरीही अडाणीच काय अगदी सुशिक्षित लोकही आमिषाला बळी पडून त्यांची फसवणूक होत आहे. कोण सिमेंट देतो म्हणून सांगतोय, कोण विजेचे बिल थकले आहे म्हणून सांगतो, तर कोण कमी दिवसांत दामदुप्पट परतावा देतो, असे सांगून लोकांना लुटण्याचे धंदे सुरू आहेत.
लुटारूंकडून फसवणुकीचा रोज नवा फंडा; कमी दरात सिमेंट देण्याचे सांगून डॉक्टरला ११.४७ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 12:51 PM