उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात एका कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांची उडाली तारांबळ
By समीर देशपांडे | Published: January 29, 2024 03:08 PM2024-01-29T15:08:01+5:302024-01-29T15:08:25+5:30
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आत्मदनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ताराराणी सभागृहामध्ये पवार ...
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आत्मदनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ताराराणी सभागृहामध्ये पवार हे सकाळी ११ वाजता आढावा बैठक घेत असताना बाहेर रस्त्यावर हा प्रकार घडला.
सागर सुबराव पुजारी (वय ३५, रा. कसबा सांगाव ता. कागल) यांचे घर अतिक्रमण ठरवून पाडण्यात आले आहे. ही कारवाई जातीय द्वेषातून झाली असल्याचे पुजारी यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.
याच्या निषेधार्थ सागर हे रॉकेलचे कॅन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पळत सुटले त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी आई आणि लहान बाळही असल्यामुळे पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली अन्य वरिष्ठ अधिकारी ही या ठिकाणी धावून गेले आणि पोलिसांनी सागर यांना पकडून त्यांच्याकडून रॉकेलचा कॅन काढून घेतला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये खळबळ उडाली.
त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले.